इम्रानखानने ३५ वर्षात भरलाच नाही आयकर

इस्लामाबाद दि.२९- पाकिस्तानच्या संसदेतील विरोधी पक्ष नेते चौधरी निसार अली खान यांनी तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचा प्रमुख व प्रसिद्ध क्रिकेटपटू इम्रानखान याने गेल्या ३५ वर्षात एक पैसाही आयकर भरला नसल्याचा आरोप केला आहे. निसार अलीखान म्हणतात, स्वतः एक पैसाही आयकर न भरता इम्रानसारखा माणूस अन्य लोकांच्या तक्रारी कशा करू शकतो हा प्रश्नच आहे. दुसर्‍यांवर खोटे आरोप करण्यापेक्षा इम्रानच्या पक्षाने देशाला सत्य परिस्थितीसह सामोरे जाण्याचे धैर्य दाखवावे. राजकीय दिवाळखोरी असलेला हा पक्ष फक्त पोकळ घोषणाबाजी करण्यातच पुढे आहे. असले राजकीय पक्ष देशाला कधीच खंबीर नेता देऊ शकणार नाहीत. इम्रान आणि त्याच्या पक्षसदस्यांनी नाटो पुरवठा, रोजगार, भारनियमन या देशापुढच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आजपर्यंत कधीच आवाज उठविलेला नाही हे लक्षात घ्यायला हवे.

Leave a Comment