
बारावीचा निकाल लागला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या शाळांचा हा निकाल ७१ टक्के लागला आहे. अन्यही जिल्ह्यांचे निकाल साधारण असेच लागले आहेत; पण नांदेडच्या या निकालाला काही अर्थ आहे. हा निकाल सार्थ आहे. दोन वर्षांपूवीं नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी या जिल्ह्यातल्या कॉपीवर बंधने आणण्याचा निर्णय घेतला. तसा तर ते सक्तीने कॉपी हा प्रकार थांबवू शकले असते पण त्या प्रकाराने थांबवलेली कॉपी त्यांच्या माघारी पुन्हा सुरू झाली असती. त्यांनी विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांना कॉपीचे मुलांच्या भवितव्यावर होणारे गंभीर परिणाम पटवून दिले आणि लोकांनी स्वत:च कॉपी बंद करावी असे आवाहन त्यांना केले. लोकांना त्यांच्याच हिताचे काही सांगितले तरी ते पटतेच असे नाही. काही वेळा ते त्यांच्या हिताचे आहे असे कळूनही नेहमीपेक्षा काही तरी वेगळे आहे याच एका कारणासाठी ते ऐकून घ्यायला तयार होत नाहीत; पण परदेशी यांनी फारच चिकाटीने हा प्रयोग राबविला. त्याचा परिणाम म्हणून कॉपी मुक्ती आंदोलनाच्या पहिल्या वर्षी नांदेड जिल्ह्याचा निकाल २८ टक्के लागला. पण नंतर लोकांना अभ्यास करून परीक्षा दिली पाहिजे याचे महत्त्व पटल्याने जिल्ह्यात कॉपी मुक्ती हा जीवनाचा एक भागच बनला. आता ७१ टक्के निकाल लागला आहे, तो खरा आणि अभ्यास करून लागला आहे. म्हणून त्या ७१ टक्क्यांचे कौतुक केले पाहिजे. श्री. परदेशी यांनी नांदेड जिल्ह्यात दोन उपक्रम राबवून महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेलाच नवे वळण देण्याचा प्रयत्न केला. एक कॉपी बंदी आणि दुसरा उपक्रम म्हणजे महसूल खात्याकडून झालेली शाळांची पटपडताळणी. या पडताळणीने तर महाराष्ट्रात किती गहजब माजला हे सर्वांनी पाहिले आहे. आता शाळांतल्या पटपडताळणीच्या पाठोपाठ महाविद्यालयांचीही पडताळणी होत असून त्याच्यामागे वाचनालयांचाही लेखा जोखा घेतला जात आहे. एकंदरीत महाराष्ट्रभर शिक्षणाची झाडा झडती होत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांनी नांदेडची पट पडताळणी उचलली पण त्या सर्वांनी कॉपी मुक्ती आंदोलनही उचलायला हवे होते. नांदेड जिल्ह्यातल्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन. बारावीचे निकाल लागले की बारावी नंतर काय यावर चर्चा सुरू होतात. दहावी आणि बारावीच्या परीक्षा मुलांच्या जीवनाला नवे वळण देणार्या ठरत असतात असे म्हटले जाते पण आता दहावीपेक्षा बारावीला अधिक महत्त्व आले आहे. कारण मुला मुलींची व्यवसायाची खरी निवड बारावी नंतरच होत असते. याबाबत मुलांना आणि पालकांनाही एक गोष्ट आवर्जुन सांगावी वाटते की, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमाची निवड करताना भावनेच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठ विचार करा. पालक मुलांच्या अभ्यास क्रमाची निवड करताना दोन गोष्टी पाहतात. एक म्हणजे प्रतिष्ठा आणि दुसरी म्हणजे आपल्या अर्धवट राहिलेल्या इच्छा. अनेक पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हावी असे वाटत असते. या दोन व्यवसायांना समाजात मान असतो आणि भरपूर पैसा मिळतो म्हणून हे आकर्षण असते पण त्यासाठी मुलांच्या मनाविरुद्ध त्यांच्यावर हे अभ्यासक्रम लादता कामा नयेत. तसे ते लादल्यास मुले त्याचा ताण घेतात आणि मनापासून अभ्यास करीत नाहीत. ते अभ्यासक्रम त्यांच्या आवडीचे असतातच असे नाही. मग त्यातले काही विद्यार्थी आत्महत्या करतात तर काही मुले आपले जीवन एक ओझे आहे असे समजून जगत राहतात. ते आपला व्यवसाय धंदा आनंदाने करीत नाहीत. तेव्हा मुलांवर आपल्या इच्छा लादण्याचा प्रयत्न पालकांनी करू नये. याचे दुसरे टोक म्हणजे मुले म्हणतील तोच अभ्यासक्रम निवडणे. पण तेही योग्य नाही. कारण मुलेही फार तर्कशुद्ध विचार करतीलच असे काही सांगता येत नाही. पालक प्रतिष्ठेच्या आहारी जातात तशी मुलेही आपला अभ्यासक्रम भावनेच्या आहारी जाऊन निवडत असतात. काही मुलांना काहीच कळत नसते. आपले सारे मित्र आणि मैत्रिणी ज्या शाखेला जातात त्या शाखेला जाण्याकडे त्यांचा कल असतो. कारण त्यांना मित्र आणि मैत्रिणी सोडायच्या नसतात. त्यांना अशा निवडीपासून परावृत्त केले पाहिजे. मित्र काय नव्याने मिळतील आपण आपला अभ्यासक्रम आपल्या कुवतीचा आणि आवडीचा विचार करून निवडला पाहिजे हे त्यांना समजून सांगितले पाहिजे. आता आता तर शिक्षण फार महाग झाले आहे. सरकार आणि विना अनुदानित संस्था यांनी ते महाग केले आहे. हजारो रुपये शुल्क भरावे लागते आणि काही विषयांची शिकवणीही लावावी लागते. अशा काही शिकवणी वर्गाची फी तर आता लाखाच्या घरात चालली आहे. एवढे खर्च करून आपण योग्य अभ्यासक्रम निवडला नाही तर आपल्या पालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असते. याचे भान मुलांनीही ठेवले पाहिजे. एकंदरीत बारावी नंतर काय, याचा विचार फारच समतोलपणे करायला हवा. आता ही निवड करताना आपण चूक केली तर आपल्याला जन्मभर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल याची जाणीव पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही ठेवली पाहिजे.
