जगनच्या मागे ससेमिरा

आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव खासदार जगनमोहन रेड्डी यांना अखेर अपेक्षेप्रमाणे अटक करण्यात आली आहे. जगन मोहन रेड्डी यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे आणि अमाप बेहिशेबी संपत्ती अर्जित केली आहे. हा सारा पैसा त्यांनी आपल्या मुख्यमंत्री असलेल्या वडिलांचा राजकीय प्रभाव वापरून कमवलेला आहे. ते वडील कॉंग्रेसचेच मुख्यमंत्री होते. एवढेच नव्हे तर ते सोनिया गांधी यांचे लाडके मुख्यमंत्री होते. राजशेखर रेड्डी लाडके होते पण त्यांचा मुलगा तेवढाच नावडता होता. त्यामुळे तो वडलांच्या माघारी आपल्यालाच मुख्यमंत्रीपदाची गादी मिळावी असा लाड करायला लागला, तेव्हा कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्याच्या मागे सीबीआयचा ससेमिरा लावून दिला.

सीबीआय ही संस्था स्वायत्त असली तरी तिने कोणाला आणि कधी अडचणीत आणावे याचा निर्णय सरकारच करीत असते. जगन मोहन रेड्डी हे डोईजड व्हायला लागले तसा सरकारने त्यांना अणचणीत आणण्याचा निर्णय घेतला. त्याच्या विरोधातली ही कारवाई नेमकी राज्यात १८ विधानसभा मतदारसंघात पोट निवडणुका होत असतानाच करण्यात आली आहे. निदान तसे चित्र निर्माण करण्याची संधी  आहे. पण सीबीआय ही यंत्रणा सरकारच्या इशार्‍या बरहुकूम काम करीत असली तरी अटकेच्या तारखा या काही सरकारच्याही स्वाधीन नसतात आणि सीबीआयच्याही स्वाधीन नसतात. कारण अटक करण्याची कारवाई बरीचशी न्यायालयाच्या स्वाधीन असते. तेव्हा ही अटक पोटनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे असा आरोप करण्याची काही संधी नाही. जनग मोहन यांच्या विरोधात झालेली एकूण कारवाई मात्र सरकारच्या इशार्‍याने झाली आहे हे नाकारता येत नाही. सरकार आता हा आरोप नाकारत असले तरी त्या नकारात काही तथ्य नाही कारण सरकार असा सीबीआय चा वापर करीत असते. आता केन्द्रात कॉंग्रेस आणि मुलायमसिंग यादव यांच्यात जो सलोखा निर्माण झाला आहे तो एका सीबीआयच्या कारवाईचाच परिणाम आहे हे बर्‍याच लोकांना माहीतही नसेल. तेव्हा  जगन मोहन रेड्डी यांनी वडिलांच्या पश्‍चात्त मु‘यमंत्री होण्याचा हट्ट धरला नसता आणि सोनिया गांधी म्हणतात ते निमूटपणे ऐकून घेतले असते तर त्यांच्यावर झालेली ही कारवाई नक्कीच झाली नसती.

सोनिया गांधी यांच्या हो ला हो देणार्‍या अनेक नेत्यांना कारवाईपासून सुटका मिळत असते हे आपल्याला माहीतच आहे. महाराष्ट्रातले काही केन्द्रीय मंत्री या होयबानिशीचा फायदा उठवत आहेत. शिवाय दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर कितीही आरोप झाले आणि त्याचे कितीही  पुरावे सादर केले गेले असले तरी त्यांना राजीनामाही द्यावा लागत नाही आणि त्यांच्यावर सीबीआय चौकशीचा मारा केला जात नाही. मात्र या ठिकाणी एक गोष्ट नाकारता येत नाही की, जगन मोहन रेड्डी यांनी मुळात काही भ्रष्टाचारच केला नसता तर त्यांच्यावर ही आपत्ती आलीच नसती. त्यांनी बराच ष्टाचार केला आहे. बराच याचा अर्थ पाहताच डोळे फिरावेत असा भ्रष्टाचार केला आहे. एवढा भ्रष्टाचार त्यांनी आपल्या वडलांच्या छत्रछायेत राहून केला आहे. ते कॉंग्रेसचेच मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्या या मुलासाठी केलेला भ्रष्टाचार सोनिया गांधी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे केला आहे. आपल्या पक्षाचे एक मुख्यमंत्री आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला कराडोच नव्हे तर अब्जावधीची माया मिळवून देत आहेत हे काही सोनिया गांधी यांना माहीत नव्हते असे नाही. पण त्यांचे आणि राजशेखर रेड्डी यांचे याबाबतीत साटेलोटेच असणार. सोनिया गांधी यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करावे आणि त्यांनी भरपूर खासदार निवडून आणून सोनिया गांधी यांच्या सरकारला आधार द्यावा अशी ती देवाण घेवाण होती. अशा पैशात लोळणार्‍या जगन मोहन यांनी सोनिया गांधी यांच्या मर्जीतून उतरायला नको होते. त्याला ते कळले नाही आणि सीबीआयचा ससेमिरा त्याने मागे लावून घेतला. 

हा ससेमिरा जाणीवपूर्वक लावलेला आहे हे तर नक्कीच आहे. जगन मोहन हाही काही तेवढा वेडा माणूस नाही. कॉंग्रेसमध्ये राबवले जात असलेले भ्रष्टाचाराचे शास्त्र त्यालाही माहीत आहे पण त्याचा दावा वेगळाच आहे. त्याचे म्हणणे असे आहे की त्याला त्याच्या वडिलांच्या माघारी मुख्यमंत्री करणे केवळ त्याच्यासाठी नाही तर कॉंग्रेस पक्षासाठीही फायद्याचे आहे. पैसे खाऊनच्या खाऊन परत सोनिया गांधी यांच्यावर डोळे वटारता कामा नयेत हे त्याला कळते. त्याचे म्हणणे असे आहे की पक्षात त्याला मानणारे अनेक आमदार आहेत. त्याच्या वडलांची पुण्याईही भरपूर आहे त्यामुळे जनताही त्याच्याच मागे आहे.  त्याला डावलल्यास राज्यात कॉंग्रेस पक्षात काही राम राहणार नाही. शिवाय हा सारा शो चालावा यासाठी भरपूर पैसा बाळगून असणारा दुसरा कोणी पक्षात नाही. एवढे आहे तर मग त्याला डावलायचे कशाला ? या सार्‍या गोष्टी त्याने सिद्ध करून दिल्या आहेत. १४ आमदार फोडून दाखवले आहेत. त्याच्या कारवायांनी कॉंग्रेस पक्ष विकलांग झाला आहे हेही दिसत आहे. पण सोनिया गांधी मानायला तयार नाहीत.  त्यामागे नेमके काय कारण आहे ते सोनिया गांधी आणि जगन मोहन या दोघांनाच माहीत आहे.