औंधमधील रुग्णालयास आग – जीवितहानी नाही

पुणे, दि. २६ – औंध येथील मेडिपॉईंट रुग्णालयाला शनिवारी सकाळी लागलेली आग जवळपास दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मेडिपॉईंट रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर रुग्णालयाचे संशोधन केंद्र व स्टोअर रुम आहे. शनिवारी सकाळी तेथील संगणक यंत्रणेत बिघाड होऊन आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. संगणक यंत्रणेत लागलेली ही आग पसरत वातानुकूलन यंत्रणेमध्ये पसरली. त्यामुळे वातानुकूलन यंत्रणेचा (एसीचा) स्फोट होऊन आग आणखी भडकली. या आगीत रुग्णालयातील बरेचसे साहित्य जळून खाक झाले. चौथ्या मजल्यावरील ही आग तिसर्‍या मजल्यापर्यंत गेली. त्यामुळे अर्ग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. तीन गाड्या, टँकर व २० जवानांच्या साहयाने दीड तासांच्या झुंजीनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.

शंभर खाटांच्या या रुग्णालयात या घटनेच्यावेळी ३६ रुग्ण दाखल होते. त्यातील चार रुग्ण आयसीयूत होते. आग लागल्याचे कळताच या रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Comment