एक्स्प्रेस वे वरील अपघात झालेल्यांना तात्काळ मदत मिळावी

पुणे, दि. २८ – एक्स्प्रेस वे वरील अपघातामध्ये जखमीं झालेल्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे वरील ओझर्डे या गावाजवळ जवळ प्राथमिक ट्रॉमा केअर सेंटर आणि हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याची योजना रस्ते विकास महामंडळाने तयार केली आहे. या सेंटरची उभारणी बीओटी तत्वावर करण्यात येणार आहे.

एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीची मदत उपलब्ध व्हावी, म्हणून ट्रॉमा केअर सेंटर बांधण्याची योजना आहे. या सेंटरमध्ये एक डॉक्टर, मिनी ऑपरेशन थिएटर आणि चार ते पाच जखमींना दाखल करण्याची सुविधा असेल. अपघातातील गंभीर जखमींना स्पेशलाइज हॉस्पिटलमध्ये हलवता यावे, म्हणून त्याठिकाणी हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध राहील. हेलिकॉप्टर पार्किंगसाठी त्याठिकाणी स्वतंत्र व्यवस्था राहाणार आहे. ही योजना बीओटी तत्त्वावर विकसीत करण्याचे महामंडळाने ठरवले असून, त्यासाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा महत्वकांक्षी प्रकल्प येत्या दिड वर्षात सूरू होण्याची अपेक्षा आहे.

एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी तळेगाव किंवा चिंचवड येथील हॉस्पिटलमध्ये हलवावे लागते. त्यामध्ये वेळ खर्च होतो आणि जखमींना वेळेत उपचार मिळत नाहीत. अपघाती जखमींवर प्राथमिक उपचार करणे तात्काळ शक्य व्हावे, म्हणून ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. इंडियन रोड कॉंग्रेसच्या नियमावलीनुसार प्रत्येक महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर असणे आवश्यक आहे. नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाने प्रत्येक महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची योजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हा प्रकल्प रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे.  

Leave a Comment