यावर्षीपासून नववी, अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात बदल

पुणे, दि. २५ – नववीतील सर्व विषयांचा, अकरावीच्या सर्व शाखांचा तर बारावीच्या विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम यंदापासून बदलण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जाधव म्हणाले, या वर्षीपासून नववी, अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. नववीतील बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके १५ जूनपूर्वी बाजारात उपलब्ध होतील. तसेच अकरावीचा सर्व शाखांचा अभ्यासक्रमही बदलण्यात येत आहे. याशिवाय बारावीच्या विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र या विषयांचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार असून तो एनसीईआरटीशी मिळताजुळता असणार आहे.

मुक्त शाळेला मान्यता
राज्यात मुक्त शाळेला तत्वतः मान्यता मिळाल्याचे सांगून जाधव पुढे म्हणाले, गुजरात, आंध्र प्रदेश याठिकाणी मुक्त शाळेची योजना चांगल्या प्रकारे राबविली गेली आहे. त्याचप्रमाणे राज्यात ही योजना राबविण्याचा विचार आहे. शासनाची मान्यता मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. यामुळे शाळेपासून वंचित राहिलेल्या मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध होईल.

क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्यांनाच २५ गुणांचा लाभ
क्रीडा विषयक जे २५ गुण मंडळाकडून देण्यात येतात ते गुण आता क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यालाच आणि ज्याला उत्तीर्ण होण्यासाठी २५ गुणांची गरज असेल त्या विद्यार्थ्यालाच देण्यात येतील, असे जाधव यांनी सांगितले. बोगस प्रमाणपत्र दाखवून गुण मिळविणार्‍यांना आळा घालण्यात येईल. यासाठी क्रीडा विभगाकडून काळजी घेण्यात येईल, असेही जाधव यांनी नमूद केले.

अंध विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या बाबतीत नेहमीच अडचणी येतात. त्यांना वेळेवर ब्रेल लिपीतील पुस्तके उपलब्ध होत नाहीत. यंदा पुस्तके सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करून दिली जातील.

दरम्यान, विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिका २ जून रोजी संबंधित महाविद्यालयात मिळणार आहेत. गुणांची पडताळणी करण्यासाठी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १२ जूनपर्यंत अर्ज करता येईल. यावर्षीपासून मंडळाकडून उत्तर पत्रिकेची छायाप्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment