भारत-पाक संबंध सुधारण्यास प्रसारमाध्यमेच परिणामकारक

पुणे, दि. २८ – सार्कमधील राष्ट्रांनी केलेल्या दहशतवाद विरोधी कराराकडे आता पाकिस्तानही गांभीर्याने पहात आहे. या विधेयकाला पाकिस्तानकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या प्रश्‍नावर दोन्ही देशांनी एकत्र मिळून काम केल्यास दोन्ही देशातील संबंधही सुधारण्यास मदत होणार असल्याची माहिती पाकिस्तानमधील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने दिली. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध सुधारण्यास मिडियानेही पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पाकिस्तानमधील पत्रकारांचे शिष्टमंडळ भारत दौर्‍यावर आले आहे. त्यांच्या पुणे भेटीवेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष ताहिर हसन खान, करामत अली, महंमद सईद सरबाजी, महंमद फैजल सयानी, नगमा इक्तेदार या पत्रकारांनी या पाकिस्तानमधील परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश घोंगडे आणि सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी तसेच संजय नहार आदी उपस्थित होते. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि कराची प्रेसक्लब तसेच हैद्राबाद प्रेस क्लब यांच्यात सहकार्य करार करण्यात आला.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांपुढे दहशतवाद ही मोठे आव्हान आहे. दहशतवाद कमी करण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. या प्रश्‍नावर भारत-पाक या दोन्ही राष्ट्रांनी एकत्रित काम करावे लागणार आहे. सन १९८७ मध्ये सार्क अस्तित्त्वात आली. त्यावेळी सार्कमधील आशियाई राष्ट्र सदस्यांनी दहशतवादाविरोधात करार केला होता. मात्र पाकिस्तानने या कराराला मंजुरी दिली नव्हती. त्यानंतर पाकिस्तानकडून खेदही व्यक्त करण्यात आला होता. आता मात्र सरकार या प्रलंबित विधेयकाकडे गांभीर्याने आणि सकारात्मक दृष्टीकोनातून पहात आहे. मात्र आगामी काळात या दोन्ही देशांमध्ये होणा-या निवडणुका लक्षात घेता ते पुन्हा लांबणीवर जाण्याची भीतीही आहे, असे या शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले. दरम्यान, या दोन्ही देशांती संबंध सुधारण्यासाठी मिडियाही महत्त्वाचा घटक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.  

Leave a Comment