नोकरीच्या नव्या संधी

job

कोणकोणत्या क्षेत्रात नोकरदारांची वाढती मागणी आहे आणि त्यातुन मला किती पगाराची अपेक्षा ठेवता येईल या विचारांचा भुंगा प्रत्येक तरुणाच्या मनात घोंघावत असतो. अशी अनेक नवनविन क्षेत्रे उदयास येत आहेत, जेथे सातत्याने नोकरींच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक मंदीचा ससेमिरा मागे लागलेला असतानाही येथे अमाप संधी आहेत हे विशेष. कोणती आहेत ही क्षेत्रे?

*      दूरसंचार (टेलिकम्युनिकेशन) कंपन्या : दूरसंचार क्षेत्रातील सेवांची गरज सतत वाढत असल्याने या क्षेत्राची वाढही झपाट्याने होते आहे. दीर्घकाळच्या एकीकरणानंतर अनेक उद्योजक या क्षेत्रात उतरल्याने तेथुन नोकरीची हमी मिळु लागली आहे. संशोधक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांना येथे फार मोठा वाव आहे. त्यांना अपेक्षेएवढा पगार नक्कीच मिळु शकतो. यासाठी तुमच्याकडे इंजिनियरिंग किंवा तंत्रज्ञान विषयातील बेचलर किंवा मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. 
   

*      सौफ्टवेअर कंपन्या : या कंपन्यांमध्ये सध्या सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत. या कंपन्यांच्या उत्पादनांना जगभरातील ग्राहकांकडुन मागणी असल्याने त्यांनाही तज्ञ, प्रशिक्षित स्टाफची आवश्यकता असते. या कंपन्या सतत सौफ्टवेअर डेव्हलपर्स, तंत्रज्ञ, वेबमास्टर्स, प्रोग्रामर्स यांच्या शोधात असतात. तेथे काम करताना आकर्षक वेतनाबरोबरच नवनविन गोष्टी शिकण्याची संधीही मिळु शकते. या कंपन्यांमध्ये प्रशिक्षकपदावर काम करताना वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याचा लाभ मिळतो. आयटी, कम्प्युटर इंजिनियर, आणि कम्प्युटर सायन्स यातील पदवीधारकांसाठी या क्षेत्रात अमाप संधी आहेत.     
   

*      आतिथ्य क्षेत्र : आलिशान स्टार हॉटेल्स, भव्य रीसौर्टस, क्लब हाऊसेस आणि विमान उद्योगात आतिथ्य क्षेत्राला फार मोठा वाव आहे. त्यामुळे विकसनशील देशांबरोबरच विकसित राष्ट्रांमध्येही आतिथ्य सेवेच्या असंख्य संधी आहेत. यातुन उत्तम वेतनाबरोबरच उत्तम जीवनशैलीचाही लाभ होतो. महिलांसाठीही हे क्षेत्र योग्य असल्याने त्यांना या क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. आतिथ्य व्यवस्थापनातील डिग्री किंवा एअरलाईन व्यवस्थापनातील डिप्लोमा तुमच्याकडे असल्यास आतिथ्य क्षेत्र तुमच्या प्रतीक्षेत आहे.
   

*      आरोग्य सुविधा क्षेत्र : आरोग्य सोयी देणाऱ्या कंपन्यांमध्ये अनेक संधी असून त्यातुन चांगले वेतनही दिले जाते. संपूर्ण जगभर आरोग्य सेवांची आवश्यकता प्रचंड असल्याने आगामी काळात हे क्षेत्र सातत्याने विस्तारित होणार आहे. साहजिकच त्यामुळे नोकरदारांचीही गरज वाढणार आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या विख्यात कंपन्यांचे जाळे देशोदेशी पसरत असल्याने तरुणांना येथे अधिक संधी आहेत. सर्जन, नर्सेस, फार्मासिस्ट, वैज्ञानिक संशोधक, वैद्यकीय सहाय्यक यांना नव्याने उघडणाऱ्या हॉस्पिटल, क्लिनीक व आरोग्यसेवा केंद्रात फार मोठा वाव आहे. संबंधित विषयातील मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी हाताशी असल्यास या क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोहोचणे काहीच अवघड नाही.    

*      रिटेल क्षेत्र : किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात नोकरीच्या सर्वाधिक संधी उपलब्ध असून आवश्यक जागा भरण्यासाठी येथे एकदम मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. फ्लोअर मैनेजर, कैशिअर, विक्रेता, ग्राहकसेवा मैनेजर अशा लोकांची या क्षेत्रात सतत आवश्यकता असते. किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये या जागा महत्वपूर्ण असल्याने त्यांना चांगले वेतनही दिले जाते. रिटेल मैनेजमेंट किंवा बिझनेस मैनेजमेंट ही पदवी मिळवलेल्यांना या कंपन्यांमध्ये वाढती मागणी आहे.

प्लंबर, हाउसकीपर, सुरक्षारक्षक, सुतार, ऑफिस प्रशासक या क्षेत्रातही नोकरीच्या चांगली संधी असुन त्यात औपचारिक पदवीची अपेक्षा नसते. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन चांगली नोकरी मिळवता येते. पुढे काही काळानंतर स्वतःचा स्वतंत्र व्यायसायही सुरु करता येतो.

Leave a Comment