नर्सिंग अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्तीचा महाघोटाळा

वर्धा, दि. २६ – दिवसाकाठी उजेडात येणार्‍या घोटाळ्याची जणू काही मालिकाच सुरू झाली आहे. आता नर्सिंग कॉलेजसमध्ये वितरित करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीचा नवा घोटाळा पुढे आला आहे. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमांमध्ये समावेश नसतांनाही नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशितांना अंदाजे ९० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. वरिष्ठ पातळीवरुन निघालेल्या आदेशानंतर झालेल्या या घोटाळ्याप्रकरणी सरकारने चौकशीचे आदेशही दिले आहेत.

राज्यातील नर्सिंग महाविद्यालयामध्ये जनरल मिडवाईफ आणि ऑक्झीलरी नर्सिंग मिडवाईफ या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशितांना शिष्यवृत्ती देय नाही. तसेच हे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासनाची मान्यताही गरजेची आहे. पण शासनाची मान्यता मिळण्यापूर्वीच बर्‍याच महाविद्यालयांमध्ये असे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले असून अंदाजे ९० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वाटण्यात आल्याची माहिती आहे. नर्सिग कॉलेजमधील नव्याने उजेडात आलेला हा घोटाळा अवघ्या शैक्षणिक क्षेत्राला हादरा देणारा आहे. राज्यातील अंदाजे ६५० संस्थांमधून एएनएम आणि जीएनएमचे शिक्षण दिले जात आहे. त्यापैकी जवळपास २६४ संस्थांना वैद्यकीय शिक्षण शुल्क परिषदेने २०१२-१३ साठी शिक्षण शुल्क ठरवून दिले आहे.

नर्सिग महाविद्यालयातील शिष्यवृत्तीच्या गैरप्रकाराबाबत अधिवेशनामध्ये तारांकीत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावेळी समाजकल्याण मंत्र्यांनीही ही बाब मान्य केली होती. हा घोटाळा जवळपास ९० कोटी रुपयांच्या घरात आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास पुन्हा सभागृहामध्ये सरकारला धारेवर धरणार असल्याचे अकोल्याचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment