लखनऊ, दि. २६ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून संघ स्वयंसेवकांनी त्यासाठी तयार राहावे. मात्र संघ आपल्या धोरणांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करणार नाही. देश आणि समाज याचा विचार करून संघ आपल्या भूमिकेचा विस्तार करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शुक्रवारी येथे केले. येथे आयोजित संघ शिक्षा वर्गात ते कार्यकर्त्यांपुढे बोलत होते.
यावेळी सरसंघचालक म्हणाले की, संघास आणखी सामर्थ्यवान बनविण्यासाठी सर्वांनी संघटितपणे आणि एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. संघ सामर्थ्यवान झाला की आपोआपच देशाचा सर्वांगीण विकास होईल. देशातील वर्तमान परिस्थितीला सरकार जबाबदार आहे. दूरदृष्टीचा अभाव असलेली धोरणे या सरकारकडून राबविली जात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्यासंबंधीचे अंदाज याआधीही वर्तविण्यात येत होते. सरसंघचालकांनी कार्यकर्त्यांपुढे बोलताना, संघात मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात, असे जे भाष्य केले आहे, त्यामुळे अशा अंदाजांना पुष्टी मिळाली आहे. संघाच्या वरिष्ठ सूत्रांनुसार, संघामध्ये व्यापक बदल होण्याचे दाट संकेत आहेत. संघाचे सेवाकार्य देशात मोठ्या प्रमाणात चालते. तसेच या सेवाकार्याचे जाळे सर्वदूर पसरले आहे. सांस्कृतिक संघटना अशी संघाची जी प्रतिमा आहे, त्यातून बाहेर पडून समाजसेवी संघटना म्हणून भूमिका बजावण्याची संघाकडून मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे.