मागणीप्रमाणे चारा उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री

मुंबई, दि. २६ – चारा डेपो व छावणी एकाच ठिकाणी उघडण्यात येणार नाही, अशी यापूर्वी टाकलेली अट शिथील करून पंचायती गणस्तरावरुन चार्‍याची मागणी झाल्यास त्या ठिकाणी चारा उपलब्ध करून देण्यात येईल, त्यासोबत टंचाई काळात छोट्या शहरांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

राज्यातील टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी ३१ मार्च २०१२ रोजी एकत्रित शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र त्यानंतरही काही अडचणी लक्षात घेऊन वाढीव उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचबरोबर ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या क्षेत्रात चाराटंचाई जाणवत असल्यास टंचाई क्षेत्राकरिता लागू करण्यात आलेल्या अटीनुसार बीड, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, सोलापूर, अहमदनगर, लातूर, पुणे, बुलढाणा, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये चाराडेपो सुरू करण्यास जिल्हाधिकार्‍यांना अधिकार देण्यात आले आहेत.

५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. अ व ब वर्ग नगरपालिकांमध्ये पेयजल टंचाई घोषित केली असेल, तर तेथे दरडोई दरदिवशी किमान ५० लीटर पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच क वर्ग नगरपालिकांमध्ये पेयजल टंचाई घोषित केली असेल, तर तेथे दरडोई दरदिवशी किमान ३० लीटर पाणीपुरवठा करण्यात येईल आणि हे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना प्रदान करण्यात येतील. तसेच टँकर नादुरूस्त झाल्यास खेपा कमी होतात, त्यामुळे मंजूर टँकर्सच्या संख्येच्या अतिरिक्त २० टक्के टँकर्स राखीव ठेवण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment