भारत-पाकिस्तानमधील जनतेमध्ये दृढ संवाद होणे गरजेचे – जयंत पाटील

मुंबई, दि. २६ – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शांततापूर्ण आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या जनतेमध्ये निकोप आणि दृढ संवाद होणे गरजेचे असल्याचे मत मुंबई शहराचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले.

मुंबई भेटीवर आलेल्या पाकिस्तानी पत्रकारांच्या प्रतिनिधी मंडळाचे शुक्रवारी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या निमित्ताने मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात पाटील बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालक प्रमोद नलावडे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष ताहीर हुसेन खान, हैदराबाद प्रेस क्लबचे अध्यक्ष महेशकुमार यांच्यासह पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळातील इतर पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते.

पूर्वग्रह दूर होऊन मनांची दरी सांधण्यासाठी हा संवाद महत्वाचा असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, या कामी माध्यमे अतिशय मोलाची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी अशा भेटी लाभदायक असून, यातून येणारा अनुभव आणि मैत्रीचे नाते अधिक आश्वासक स्वरूपाचे राहील.

भारतात आपण शांतीचा संदेश घेऊन आल्याचे हैदराबाद प्रेस क्लबचे अध्यक्ष महेशकुमार यांनी सांगितले. या कामी माध्यमे खूप महत्वपूर्ण कामगिरी करू शकतात. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी बोलण्याची संधी या भेटीने दिली असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment