बारावीचा निकालात राज्यात कोकण सरस; यंदाही मुलीच आघाडीवर

पुणे, दि. २५ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. राज्यातील ६७.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत २.३३ टक्के जास्त आहे. यंदा नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून ८६.२५ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यंदाही बारावीच्या निकालात मुलीच सरस ठरल्या असून ७९.६६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७०.३२ इतके आहे.

कोकण विभागाचा निकाल ८६.२५ टक्के इतका लागला असून, या विभागाने यंदाच्या निकालावर वर्चस्व मिळवले आहे तर कोल्हापूर विभागाने ७६.७४ टक्के यश मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. पुणे विभागात ७५.७४ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. अमरावती विभागाचा निकाल सर्वात कमी ५६.०० टक्के इतका लागला आहे. मुंबईतील ६८.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून,  नाशिकमधील ६९.६२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूरमध्ये ६६.११ टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ६१.२७ टक्के लागला आहे. नागपूर विभागात ६२.५९ टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
   
या वर्षी बारावीच्या परीक्षेला राज्यातून एकूण १३ लाख २६ हजार ०६४ विद्यार्थी  बसले होते. त्यापैकी ९ लाख ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेमध्ये १ लाख ८२ हजार ९२९ पुनर्परिक्षार्थींपैकी ४९ हजार ६५९ उत्तीर्ण झाले असून २७.१५ टक्के निकाल लागला आहे. यंदा प्रथमच स्वतंत्र परीक्षा घेतलेल्या कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. तर अमरावती विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्यातील ७ हजार ४८१ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी १ हजार १८८३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.

शाखानिहाय निकालामध्ये एमसीव्हीसी शाखेचा सर्वात जास्त ८५.०६ टक्के तर सर्वात कमी ६५.६९ टक्के कला शाखेचा निकाल लागला आहे. तसेच विज्ञान शाखेचा ८४.८७ टक्के आणि वाणिज्य शाखेचा ७१.४३ टक्के निकाल लागला आहे. राज्यात यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.

विषयवार उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांचा निकाल इतर विषयांपेक्षा चांगला लागला आहे. मराठीमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.०६ टक्के असून हिंदी ९३.२५ टक्के आणि इंग्रजी ८०.२९ इतके आहे.

    

Leave a Comment