पेट्रोल दरवाढीमुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत ३०० कोटींची भर?

मुंबई- केंद्राने केलेल्या भरभक्कम पेट्रोल दरवाढीविरोधात महाराष्ट्रातही ठिकठिकाणी निदर्शने केली जात असली तरी महाराष्ट्र शासनाच्या खडखडाट असलेल्या तिजोरीत त्यामुळे ३०० कोटी रूपयांची भर २०१२-१३ सालात पडणार आहे. अतिरिक्त विक्रीकरातून हा पैसा जमा होणार असल्याचे अर्थमंत्रालयातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

या विषयी या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना खरोखर इच्छा असेल तर ते हा जादा भार कमी करू शकतात. व्हॅट रद्द करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट समोर मांडून ते सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीतून दिलासा देऊ शकतात. २०१२-१३ सालचा अर्थसंकल्प तयार करताना ही पेट्रोल दरवाढ लक्षात घेतली गेली नव्हती त्यामुळे चव्हाण यांना धाडसी निर्णय घेऊन हा विक्रीकर कमी करता येईल. मात्र मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी महाबळेश्वर येथे एका कार्यक्रमात बोलताना पेट्रोलवरील व्हॅट रद्द करणे अशक्य असल्याचे सांगितले होते. अर्थात यावर कॅबिनेटमध्ये विचार केला जाऊ शकतो असे सांगतानाच पेट्रोल दरवाढीतून त्वरीत दिलासा देणे अवघड असल्याचे सांगून त्यांनी ही दरवाढ आयात खर्चातील वाढ व रूपयाच्या अवमूल्यनामुळे झाली असल्याचे सांगितले होते. तसेच सध्या राज्यात दुष्काळ असल्याने जादा  फंडांची राज्याला आवश्यकता असल्याचेही स्पष्ट केले होते.

यंदाच्या वर्षात राज्याला व्हॅटमधून ५७ हजार कोटी रूपयांचा महसूल मिळणार असून त्यापैकी ४ हजार कोटी पेट्रोलवरील व्हॅटमधून मिळणार आहेत. नुकत्याच झालेल्या पेट्रोल दरवाढीतून विक्रीकर विभागाला ३०० कोटींचा महसूल मिळणार आहे. राज्यात पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो.

Leave a Comment