चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांचे वर्चस्व

पुणे, दि. १४  – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (चौथी) शिष्यवृत्ती परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण ६६.६५ टक्के इतका निकाल लागला आहे. या परीक्षेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८ तर पुणे शहरातील ८ विद्यार्थ्यांनी ३०० पैकी ३०० गुण मिळविल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष एच. आय. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते. गेल्या दोन वर्षापासून परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आल्याने गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहा हजार लोकसंख्येच्या प्रमाणात तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. ग्रामीण भागातून ऋषिकेश काळुराम भागडे सह १७ विद्यार्थ्यांनी तर शहरी भागतून जेजुरीच्या यशवंराव होळकर प्राथमिक शाळेचा विद्यार्थी अथर्व प्रशांत कदम याच्यासह इतर ७ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे.
    परीक्षा परिषदेच्यावतीने मागील १८ मार्च रोजी ही पूर्व माध्यमिक (चौथी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण १० लाख ४८ हजार ४३२ विद्यार्थी बसले होते. त्यातील एकूण ७ लाख २२ हजार २२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यातील १८ हजार ४०९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या परिक्षेत पुणे- १ हजार ३३०, सातारा ५१२, कोल्हापूर – ६४२,  सांगली – ४५५, रत्नागिरी – ३२६, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यान १६४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचा ५९.१०, कोल्हापूर – ७७.०७, सागंली- ६६.४४, परभणी – ५७.५२, सातारा- ७३.१८, सिंधुदुर्ग ८८.३७, रत्नागिरी-७३.७७ टक्के असा निकाल लागला आहे. सर्वाधिक ८८.३७ टक्के निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तर सर्वात कमी २८.५७ टक्के निकाल नांदेड जिल्ह्याचा लागला आहे.
जि.प. शाळांचा निकाल उंचावला
मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील एकूण १ हजार २५९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती. तर यंदा १ हजार ३३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचाही निकाल यंदा उंचावला असून राज्यास्तरीय गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद शाळेतील १३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
निकालाचा गोंधळ
 इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेच निकाल गेल्या शनिवारी जाहीर होणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे निकाल लांबणीवर टाकण्यात आला. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास निकाल लागणे अपेक्षित असतानाही परीक्षा परिषदेने साधारण सात वाजता संकेतस्थळावर निकाल टाकला. मात्र, तीन वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेवर गर्दी केली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निकाल खूप उशिरा कळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Leave a Comment