अक्षयने केली नर्गीसची छुट्टी

‘रॉकस्टार’ चित्रपटामध्ये रणबीर कपूरची नायिका बनून बॉलीवूडमध्ये दाखल झाल्यानंतर दुसर्‍याच चित्रपटात अक्षयकुमारसोबत काम करायला मिळाल्याने नर्गीस फाक्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता; पण तिच्या या आनंदाला कुणाची तरी नजर लागली. आगामी खिलाडी मध्ये अक्षयच्या नायिकेच्या रूपात नर्गीसला साईन करण्यात आले होते. मात्र, यातून तिची गच्छंती झाल्याचे समजते. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन नर्गीसच्या भावाची भूमिका साकारणार होते; पण प्रकृतीच्या कारणामुळे आणि बिझी शेड्यूलमुळे अमिताभ यांनी या चित्रपटातून अंग काढले.

अक्षयकुमार या चित्रपटाचा निर्माताही असल्याने त्याच्या सांगण्यावरून त्या जागी मिथुन चक्रवर्तीची निवड केली गेली. मिथुननेही होकार दिला; पण त्यानंतर प्रॉब्लेम समोर आला. मिथुनच्या बहिणीच्या भूमिकेत नर्गीस शोभून दिसणार नसल्याचे अक्षयला वाटले. मिथुन एका गँगस्टरची भूमिका साकारत असून नर्गीसचा लूक खूपच मॉडर्न असल्याचे अक्षयचे म्हणणे आहे. त्यामुळेच अन्य नायिकेचा शोध सुरू आहे. आशिष आर. मोहन हा नवोदित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Leave a Comment