‘एचपी’ २७ हजार कर्मचार्‍यांना काढणार

मुंबई, दि. २५ – तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची ह्युलेट पॅकार्ड उर्फ एचपी ही कंपनी आपला खर्च कमी करण्यासाठी कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी २७ हजार कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखविणार आहे. दुसर्‍या तिमाहीत नफ्यामध्ये मोठी घट झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

येत्या दोन वर्षांत २७ हजार कर्मचारी किवा ३१ ऑक्टोबर २०११ पर्यंतच्या कर्मचार्‍यांच्या एकूण संख्येपैकी आठ टक्के कर्मचार्‍यांची कपात केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कर्मचारी कमी केल्यामुळे जगभरातील या कंपनीच्या सर्व शाखांमधून तीन ते साडेतीन अब्ज डॉलरची बचत होईल, असा कंपनीचा दावा आहे. कर्मचारी कपातीने होणारी बचत कंपनी क्लाऊड कॉम्प्युटिंग डाटा सिक्युरिटी व इतर विभांगामध्ये संशोधनासाठी गुंतविणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ३० एप्रिल अखेरपर्यंत कंपनीला १.६ अब्ज डॉलरचा नफा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ३१ टक्के घट झाली. तसेच महसूलामध्येही तीन टक्के घट झाली.

Leave a Comment