हॉलमार्किंगबाबत अजूनही सराफ व्यावसायिक उदासीनच

पुणे दि.२५- सोन्याच्या शुद्धतेची खात्री देण्यासाठी हॉलमार्कींगची सुविधा उपलब्ध करून देऊनही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये कार्यरत असलेल्या सुमारे १७०० सराफ व्यावसायिकांपैकी फक्त १८० सराफांनी हॉलमार्किंग परवाने घेतले असल्याचे दिसून आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना भारतीय मानांकन ब्युरोचे पुणे विभाग प्रमुख बी.एम.हनीफ म्हणाले की हॉलमार्किंग सुविधेला गेल्या पाच सहा वर्षात अधिक गती मिळाली आहे. २००६ सालात युती सरकारने परवाना पद्धत सुलभ केल्यापासून ही गती मिळाली असून पुण्यात आता हॉलमार्किंग करून देणारी तीन केंद्रे आहेत. सरकारनेही हॉलमार्किंगला मान्यता दिल्यानंतर आता हळूहळू सराफ व्यावसायिकही हॉलमार्किंग करून घेऊ लागले आहेत. मानांकन ब्युरो राज्यातील १४ जिल्ह्यात ज्या उत्पादनांसाठी परवाने देते त्यात हॉलमार्किंगचा वाटा २० टक्के इतका आहे.
 
हॉलमार्किंग परवाना मिळविण्यासाठी १५ ते २० हजार रूपये खर्च करावा लागतो मात्र हॉलमार्किंग करून घेण्यासाठी सरकार अवघे २० रू.फी आकारते. मात्र प्रत्यक्षात असे दिसते आहे की ज्या सराफांनी हे परवाने घेतले आहेत, त्यांच्या व्यवसायावर त्याचा फारसा अनुकुल परिणाम दिसून आलेला नाही. गेल्या वर्षात ५० सराफांना असे परवाने देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य सराफ फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका या विषयी बोलताना म्हणाले की, पुण्यात ज्या प्रमाणात व्यवसाय होतो, त्या प्रमाणात हॉलमार्किंग सेंटरची संख्या अपुरी आहे. शिवाय संबंधित केंद्रावर दागिने हॉलमार्किंग करून घेण्यासाठी अनेक वेळा लांबवर प्रवास करून जावे लागते व त्यामुळे दागिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍नही निर्माण होतो. तेथेही हॉलमार्किंग सरसकट केले जाते. म्हणजे सोन्याचा नेकलेस असेल तर त्याच्या हुकसाठी आणि साखळीसाठी वेगवेगळ्या कॅरेटचे सोने वापरले जाते मात्र हॉलमार्किंग समानच होते. त्यामुळे सध्या तरी शहरातील बडे सराफ व्यावसायिकच हॉलमार्किंग करून घेण्यास तयार होताना दिसते. दुसरे म्हणजे छोटे सराफ कमी प्रतीचे सोने विकतात असे गृहीतच धरलेले असते. यामुळे हॉलमार्किंगसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.

हनीफ यांच्या माहितीनुसार मात्र हॉलमार्किंग केंद्रावर ९ ते २३ कॅरेटपर्यंतच्या सोन्याचे हॉलमार्किंग केले जाते. याचा सर्वाधिक फायदा सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांना होत असतो कारण हॉलमार्किंगमुळे कमी कॅरेटचे सोने जास्त दरात घेण्याचा धोका उरत नाही. परिणामी सोनारांनाही ग्राहकांना फसविणे अवघड जाते.

Leave a Comment