माजी मंत्री बांदेकर यांचे निधन

पणजी, दि. २४ – गोव्याचे माजी मंत्री संजय बांदेकर (५९) यांचे गुरूवारी दुपारी ३.४५ वाजता मडगाव येथील एका खाजगी रूग्णालयात निधन झाले. ब्रेन हॅमरेजमुळे ९ मे रोजी त्यांना व्हिक्टर ऑपोले इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच गुरूवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कर्नाटकाचे मंत्री आनंद अस्नोटीकर (कारवार) यांचे ते सासरे होते.

आगोंद – काणकोण येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेले बांदेकर एक धाडसी व धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. स्पष्टवक्ते आणि मोकळ्या स्वभावामुळे एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचे मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला. १९८९ साली ते सर्वप्रथम महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकीटावर निवडून आले. मात्र, ९२ साली म. गो.त फूट पडली. बांदेकर यांनी रवी नाईक यांच्यासोबत कॉंग्रेसचा रस्ता धरला व रवी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री बनले. पुढे राजकीय अस्थिरतेमुळे त्यांची कारकीर्द खालावत गेली.

अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी ते भाजपात दाखल झाले. भाजपचे काणकोण मतदारसंघाचे उमेदवार रमेश तवडकर यांना निवडून आणण्यासाठी बांदेकर यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. बांदेकर यांना संगीताचीही आवड होते. ते स्वतः पेटी, तबला ही वाद्ये वाजवायचे. मैफिली जमवायचे. त्यांच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगी व दोन मुले असा परिवार आहे.     

Leave a Comment