फ्रान्सचे अध्यक्ष होलेंड आणि फर्स्टलेडी व्हेलरी लवकरच विवाहबंधनात अडकणार

पॅरीस- फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष फ्रँकोईल होलेंड आणि त्यांची मैत्रिण व्हेलरी टायविलर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. फ्रान्सचा इतिहासात विवाह न करताच अध्यक्ष व फर्स्ट लेडी बनण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. मात्र व्हेलरी आणि होलेंड या दोघांनीही विवाह हा त्यांचा खासगी प्रश्‍न असल्याचे व फ्रान्सच्या राज्यघटनेत विवाहित असल्याशिवाय अध्यक्ष व फर्स्टलेडी बनता येणार नाही असा कुठलाही नियम नसल्याचे मत यापूर्वीच व्यक्त केले होते.

मात्र आता ते दोघेही लवकरात लवकर विवाह करणार आहेत कारण अध्यक्षांच्या सल्लागारांनीच त्यांच्यामागे तसा आग्रह धरला आहे. सल्लागारांच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष आणि त्यांची मैत्रिण यांना कडक धार्मिक निर्बंध पाळणार्‍या देशात जाण्याची वेळ आली तर त्या भेटीं अडचणीत सापडू शकतील. उदाहरणार्थ सौदी अथवा व्हॅटीकन सारख्या  देशांत त्यांना कदाचित प्रवेशच करू दिला जाणार नाही आणि ही बाब फ्रान्ससाठी लाजीरवाणी ठरू शकेल. सल्लागारांची ही मात्रा बरोबर लागू पडली असल्याचेही सांगण्यात येत आहे.

होलेंड यांची प्रथम पत्नी सेगोलिन हिच्यापासून त्यांना पहिल्या विवाहाची पाच मुले आहेत. व्हेलरी आणि होलेंड यांची गाठ पंधरा वर्षांपूर्वी एका राजकीय कार्यक्रमांत पडली होती मात्र गेले पाच वर्षे ते एकत्र राहात आहेत. व्हेलरी व्यवसायाने पत्रकार आहेत. व्हेलरी यांच्या कुटुंबियानी लवकरात लवकर या दोघांचा विवाह समारंभ चांगल्या पद्धतीने साजरा केला जाईल असे सांगितले आहेच. व्हेलरी या स्वत:चे ठाम मत असलेल्या व्यक्ती आहेत त्यामुळे त्या विवाहास कशा तयार झाल्या असे विचारले असता अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या जी८ समिटमध्ये अमेरिकन पत्रकारांनी त्यांना पुन्हा पुन्हा विवाहावरून छेडल्याने त्यांचे मतपरिवर्तन झाले असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment