पेट्रोल भडकले पण कार झाल्या स्वस्त

मुंबई, दि. २५ – पेट्रोलच्या किमतींमध्ये लिटरमागे विक्रमी साडेसात रूपयांची भाववाढ झाल्यानंतर त्याचा फटका विक्रीला बसेल या भीतीने देशातील टाटा, मारूती व ह्युंदाई या आघाडीच्या मोटर उत्पादक कंपन्यांनी पेट्रोल श्रेणीतील मोटरींवर ५० हजार रूपयांपर्यंतच्या सवलती नुकत्याच जाहीर केल्या आहेत.
सर्वात मोठी मोटर उत्पादक कंपनी असलेल्या मारूती सुझुकीने आपल्या सर्वात लोकप्रिय अल्टो कारवर ३० हजार रूपयांची सवलत जाहीर केली आहे. टाटा मोटर्सनेही विक्री गतिमान करण्यासाठी इंडिका व इंडिगो या कारवर १० हजार रूपयांपासून ते ५० हजार रूपयांपर्यंत घसघसशीत सवलत जाहीर केली आहे. ह्युंदाई मोटर्सने आपल्या पेट्रोल प्रकारातील सर्व कारवर तीन हजार रूपयांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर चढतच असल्याने कार विक्री थंडावली आहे. त्यातच पेट्रोलची भाववाढ झाल्यामुळे ग्राहक नवीन कार खरेदीचा विचार करणार नाही. त्यामुळे विक्री वाढविण्यासाठी कंपनीने अल्टोच्या किंमती ३० हजार रूपयांनी कमी केल्या आहेत, अशी माहिती मारूती सुझुकीचे व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी मयांक पारेख यांनी दिली. तसेच पेट्रोल प्रकारातील इतर कारवरही कंपनीकडून १५ ते २० हजार रूपयांची सवलत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

टाटा मोटर्सने नॅनोवरही १० हजार रूपयांची सवलत देण्यात येत असल्याचे सांगितले. पेट्रोल भाववाढीचा धसका घेतलेल्या ह्युंदाईनेही विक्री वाढविण्यासाठी इऑन, सँट्रो, आय १०, आय २०, अॅसेट व वेर्ना या पेट्रोल प्रकारातील कारवर तीन हजार रूपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ह्युंदाई चे संचालक अरविद सक्सेना यांनी सांगितले.

Leave a Comment