नागपूरमध्ये तापमानात विक्रमी वाढ, पारा ४६.९ अंशावर

नागपूर, दि. २५ – शुक्रवारी नागपूरचा पारा चढत्या भाजणीतच राहिलेला आहे. तापमानात ४६.९ अंश सेल्सिअस, अशी विक्रमी तापमानाची नोंद झालेली आहे.

गेले ४ दिवस नागपूरचे तापमान सतत चढतच राहिलेले आहे. गुरूवारी तापमान ४६.४ अंश सेल्सिअस इतके होते. शुक्रवारी त्यावरही कडी करीत पारा ४७ अंशाजवळ पोहोचला आहे.

सकाळपासूनच शहरात उष्ण वारे वाहात होते. दुपारी ११ नंतर तर घराबाहेर निघणेही कठिण झाले होते. परिणामी शहरात अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र निर्माण झाले होते. प्रत्येकजण घरात किंवा कार्यालयात कूलरच्या थंड हवेत बसण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, वाढत्या तापमानामुळे कुलरही काम करेनासा झाला होता. ज्यांना कुलरचे सुख मिळू शकणार नव्हते ते रस्त्यात झाडाखाली आसरा शोधतांना दिसत होते.

नागपूरवरही ताण करीत ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे पारा ४७.१ अंश सेल्सिअसवर होता. तर वर्ध्याचे तापमान ४७ अंश सेल्सिअस इतके होते. गोंदियानेही ४५.३ अंश सेल्सिअसवर पारा नेला. अकोला ४४.६, अमरावती ४४.४, यवतमाळ ४३.८ आणि वाशिम ४२ अंश सेल्सिअस असे तापमान आज विदर्भात होते.

आजपासून सुरू झालेल्या नवतपामुळे पारा चढताच राहणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुढला एक आठवडा तरी विदर्भात अंगाची लाही करणारा उन्हाळा वैदर्भियांना सहन करावा लागणार हे निश्‍चित आहे.

Leave a Comment