नरेंद्र मोदी २०१३ ला दिल्लीच्या राजकारणात येणार

मुंबई दि.२५- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळाली असतानाच गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुढील वर्षात म्हणजे २०१३ मध्ये दिल्लीच्या राजकारणात प्रवेश नक्की मानला जात असल्याचे समजते.

पक्षांतील खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मुंबईत सध्या सुरू असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला उपस्थित राहण्याचे नरेंद्र मोदी यांच्याकडून मान्य करून घेतले होते. मात्र मोदींची त्यासाठी केवळ एकच अट होती ती म्हणजे महासचिव संजय जोशी यांची कार्यकारणीतून हकालपट्टी. संजय जोशी यांनी राजीनामा दिला आणि ही अट पुरी झाली.

मोदी समर्थकांना आता नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी सोपविली जावी अशी इच्छा आहे. गुजराथमध्ये हिवाळ्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांत मोदींना मागीलप्रमाणेच करिश्मा दाखविला तर त्यांना २०१३ सालच्या मध्यात दिल्लीत आणले जाईल असा शब्द वरीष्ठांनी दिला असल्याचेही समजते. विशेष म्हणजे संघ परिवारही याला अनुकुल आहे.

दिल्लीतील सध्याचे भाजपचे नेते अरूण जेटली आणि सुषमा स्वराज (राज्यसभा व लोकसभा विरोधी पक्ष नेते) हे दिल्लीतलेच नेते आहेत.ते देशभर फिरून पक्षाची प्रतिमा अधिक उजळ होण्यासाठी उपयोगाचे नाहीत असे मत वरीष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ही महत्त्वाची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर सोपविली जाणार असून पुढच्या वर्षाच्या जूनपर्यंत नरेंद्र मोदी भारत भ्रमण करून भाजपला अनुकुल असे वातावरण देशात तयार करण्यासाठी सिद्ध होत आहेत. यामुळे पक्षाला लोकसभा निवडणुकांत चांगला फायदा होईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

अर्थात मोदींना दिल्लीत मोठी जबाबदारी निभावण्यापूर्वी गुजराथ विधानसभेत प्रचंड बहुमत मिळविण्याचा पराक्रम करावा लागणार आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर कामाचा मोठाच बोजा सध्या तरी पडणार आहे हे निश्चित.

Leave a Comment