गडकरी गड सांभाळतील?

भारतीय जनता पार्टीचा गड आगामी तीन वर्षे नितीन गडकरी यांनीच सांभाळावा असा निर्णय भाजपाने घेतला आहे. अर्थात हा निर्णय काही भाजपाचा नाही. भाजपाच्या कार्याची सूत्रे जिथून हलतात त्या नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. संघ श्रेष्ठींनी गडकरी यांचा गेल्या तीन वर्षातला कारभार पाहून हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा अध्यक्ष निवडताना तो पक्षाला सत्तेवर आणू शकेल की नाही हेच पाहिले जात असते. गडकरी आता २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत काय करतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि या मोक्याला संघाने त्यांना अध्यक्षपद पुन्हा दिले आहे. गडकरी हे भाजपाला केन्द्रात सत्तेवर आणतील का याचा विचार करायला लागतो तेव्हा असे लक्षात येते की,  आता तरी भाजपासाठी दिल्ली दूर दिसत आहे; कारण पक्षाला अंतर्गत मतभेदांची बाधा झाली आहे. भारतीय जनता पार्टीला ज्या शिस्तीसाठी वाखाणले जात होते ती शिस्त आणि पक्षनिष्ठा या पक्षात राहिलेली नाही. आपल्या स्थानाला थोडा धक्का लागत आहे असे दिसताच सोनिया गांधी यांचे स्तुती स्तोत्र गाणारे येडीयुरप्पा चक्क या पक्षाच्या केंद्रिय कार्यकारिणीत राहू शकतात.

२०१४ साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता येणार असेल तर पंतप्रधान कोण, हा विषय निघतो तेव्हा अडवाणी रुष्ट होतात कारण पक्षात त्यांच्या पंतप्रधानपदाला कोणीच दुजोरा देत नाही. पक्षाच्या नेत्यांच्या मनात अडवाणी यांच्या विषयी आदर आहे पण त्यांचे वय फार झाले आहे आणि त्यांना संघाचा पाठींबा नाही या दोन कारणांवरून ते पंतप्रधान होऊ शकणार नाहीत असे अनेक नेत्यांना वाटते. अनुभव आणि कुवत या दोन्ही अंगांनी ते योग्य उमेदवार आहेत पण तसा योग काही दिसत नाही. त्यामुळे अडवाणी यांना सतत डावलले जाते आणि त्यातून रुसवे फुगवे सुरू होतात. तसे भाजपातले मतभेद पक्षात फूट पाडणारे नाहीत पण सतत अहंकाराचे मुद्दे समोर येत असतात आणि पक्षाचा कारभार एकदिलाने सुरू नाही असे स्पष्ट दिसते. पक्षाला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेन्द्र मोदी यांच्या सारखा नेता मिळाला आहे. तसे असेल तर मग उगाच अडवाणीच्या मागे उभे राहण्यात काय होईल, असे या कार्यकर्त्यांना वाटत असेल तर त्यात त्यांची काही चूक नाही. मात्र त्यामुळे अडवाणी नेहमी नाराज असतात.

येडीयुरप्पा, वसुंधरा राजे, नरेन्द्र मोदी यांनी स्वत:पेक्षा पक्षाला कमी लेखायला सुरूवात केली आहे. त्यांनी पक्षाच्या बदनामीला क्षुल्लक ठरवून स्वत:च्या तक्रारी माध्यमांतून मांडायला सुरूवात केली आहे. अशाने पक्षाची प्रतिमा डागाळते याची त्यांना काही भीती नाही. नितीन गडकरी यांना काल राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या प्रारंभालाच मोदी यांच्या व्यक्तिवादाचा दणका बसला. गडकरी यांनी सरचिटणीस म्हणून नेमून उत्तर प्रदेशाचे प्रभारी केलेले संजय जोशी यांना नरेन्द्र मोदी यांच्या हट्टापायी राजीनामा द्यावा लागला. मोदी हे देशाचे पंतप्रधान होण्यास उत्सुक आहेत ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. आज पक्षातही आगामी पंतप्रधान म्हणून कोणा एकाकडे पाहिले जात असेल तर ते मोदी यांच्याकडेच होय पण मोदी यांना आपल्या या लोकप्रियतेचा गर्व आहे आणि त्यांना आपण म्हणजे पक्ष असे वाटते. त्यामुळे त्यांना आवरावे लागते. त्यातून पक्षातले राजकारण सुरू होते. कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा होता कामा नये असे गडकरी यांना वाटते आणि ते योग्यही आहे. गडकरी यांना आता २०१३ ते २०१५ या तीन वर्षांसाठी पुन्हा अध्यक्ष करण्यात आले आहे. २००९ साली ते प्रथम अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्यासमोर काही आव्हाने होती तशी आताही अभी आहेत. २००४ आणि २००९ अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पराभवाचे धक्के बसलेल्या आणि निराश झालेल्या भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा बळ देण्याचे काम नितीन गडकरी यांच्यावर येऊन पडले होते. त्यांच्या तीन वर्षाच्या या कारकिर्दीचे त्यांनी पक्षाला पराभवाच्या मनस्थितीतून बाहेर काढले आहे. पण आपल्या विषयी फार काही आशा निर्माण होतील असेही त्यांनी काही केलेले नाही. पण आता भाजपात गडकरी यांच्यापेक्षा चांगला अध्यक्षपदाचा उमेदवार उपलब्ध नाही. गोव्यामध्ये मिळालेला देदिप्यमान विजय आणि पंजाबमध्ये राखलेली सत्ता त्याच पाठोपाठ दिल्ली महानगरपालिकेत मिळवलेले प्रचंड यश या गडकरींच्या जमेच्या बाजू आहेत. पण उत्तरांचलातली सत्ता गमावली आहे. ओरिसात बिजदशी केलेली युती मोडली आहे. तेलुगु देसम हा जुना मित्र पुन्हा भाजपा कडे वळत नाही. जयललिता यांचा काही भरवसा नाही. तेव्हा सर्वांचे आकर्षण ठरलेली २०१४ सालची लोकसभा निवडणूक भाजपाला कशी जिंकता येईल याबाबत शंका आहेत. पक्षाला त्यांनी नेमके काय दिले असा प्रश्‍न विचारला तर फार काही मोठे उत्तर मिळत नाही आणि त्यांच्यामुळे फार पक्षाला फार मोठी हानी सहन करायला लागली असेही झालेले नाही. गडकरी काठावर पास आहेत.

Leave a Comment