महाराष्ट्रात नाट्य, संगीत, कला संस्कृतीचा विचार नाही- लालन सारंग

पुणे, दि. २५ – आजकाल सगळीकडे क्रिकेटविषयी बोलले जाते. मात्र, कलाकारांविषयी कोठेही बोलले जात नाही. सांस्कृतिक महाराष्ट्रातच नाट्य, संगीत, कला संस्कृतीचा विचार केला जात नाही, अशी खंत जेष्ठ रंगकर्मी लालन सारंग यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने पुणे शाखेच्या ३४व्या वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, श्रीकांत मोघे, लालन सारंग, प्रसाद सावकार यांच्या ध्वनीचित्रफिती लोकार्पण करण्यात आल्या. यावेळी लालन सारंग बोलत होत्या.

लालन सारंग म्हणाल्या, जेष्ठ रंगकर्मीच्या तयार करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीचा उपक्रम खूप स्तूत्य आहे. मात्र, हा उपक्रम खूप पूर्वी सुरू होणे गरजेचे होते. चित्रपटातील कलाकार तरी रसिकांना दिसतात पण रंगकर्मींना फार कमी लोक ओळखतात. या ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून नाटककार लोकांपर्यत पोहचण्यास मदत होईल. ‘सखाराम बाईंडर’ आणि ‘रथचक’ ही आपल्या कारर्किदीतील महत्वाची नाटके होती. मात्र, या नाटकांचे आपल्याकडे कोणतेही ‘डॉक्युमेंटेन्शन’ नाही याची खंत वाटते असेही त्या म्हणाल्या.

यावेळी नाट्यपरिषदेच्या वतीने अनेक कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. यामध्ये पिंजरा फेम संकृती बालगुडे हिला कै. सुनील तारे पुरस्कार, विनोदी कलाकार वसंत शिंदे पुरस्कार – विजय पटवर्धन, संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल शैला दातार, नाट्य सेवा पुरस्कार- प्रकाश पारखी यांना तर राम नगरकर स्मृती पुरस्कार दशरथ वाघुले यांना प्रदान करण्यात आला.

Leave a Comment