चळवळीसाठी महिलेने दिलेले सोने अण्णांनी केले साभार परत

वाशीम, दि. २५- अण्णा हजारे यांच्या दौर्‍यादरम्यान मंगरुळनाथ येथील शारदा पाटील नावाच्या एका गरीब महिलेने अण्णांच्या या चळवळीत आपलेही काही योगदान असावे या हेतूने पै पै जोडून जमा केलेले १५ हजार रुपयांचे ५ ग्रॅम सोने अण्णांच्या झोळीत टाकले. मात्र, अण्णांना हे कळताच त्यांनी या गरीब महिलेचे सोने परत करण्यास सांगून तिच्या भावना आम्ही स्वीकारत असल्याचे सांगितले. त्यानुसार भ्रविजच्या कार्यकर्त्यांनी मंगरूळनाथ येथे जाऊन या गरीब महिलेचे सोने तिला परत केले.

लोकायुक्त विधेयकांच्या जनजागृतीसाठी अण्णा हजारे यांचा महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे. या दौर्‍यादरम्यान अनेक दानशूर व्यक्ती अण्णांच्या या कार्यासाठी तन मन धनाने पुढे येत आहेत. अण्णांच्या चळवळीत आल्यावर येथे गरीब किवा श्रीमंत असा भेदभाव राहत नाही. लोकपालाच्या या लढाईत विविध ठिकाणी सभा घेतल्यावर उपस्थितांमध्ये झोळी फिरविली जाते. या झोळीमध्ये जी रक्कम जमा होईल त्या रकमेतूनच पुढील कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. वाशीम येथे झालेल्या अण्णांच्या दौर्‍याप्रसंगी मंगरूळनाथ येथील एक सामाजिक कार्यकर्त्या शारदा पाटील यांनी अण्णांच्या चळवळीने प्रभावित होऊन अण्णांना १० हजार रुपये देण्याचा संकल्प सोडला होता.

Leave a Comment