सोनी कंपनी सर्व फिचर फोन बाजारातून काढून घेणार

कोलकाता दि.२४- सोनी मोबाईल कम्युनिकेशन इंडिया या जपानच्या सोनी कंपनीच्या उपकंपनीने या वर्षाच्या सप्टेंबरअखेर पर्यंत त्यांच्या कंपनीचे सारे फिचर फोन्स ( नॉन स्मार्ट फोन्स) बाजारातून काढून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. वेगाने विकसित होत असलेल्या स्मार्टफोन बाजारपेठेवरच अधिक लक्ष केंद्रीत करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी.बालाजी या विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की सप्टेंबरपर्यंत सर्व फिचर फोन बाजारातून काढण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता, आता फक्त त्याची अमलबजावणी केली जाते आहे. कंपनीचे सध्या सहा ते सात प्रकारचे फिचर फोन बाजारात आहेत. सोनी एरिक्सन ही मोबाईल कंपनी आणि स्वीडनच्या एलएम एरिक्सन यांच्या परस्पर सहकार्यातून स्थापली गेली होती तीही आता पूर्णपणे जपानी कंपनीच्या अधिपत्याखाली आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बालाजी म्हणाले की याच कंपनीने स्मार्टफोन ‘ एक्सपिरीया‘ या ब्रँडनेमखाली बाजारात आणले असून यापुढेही याच ब्रँडनेमने ते विकले जाणार आहेत. कंपनीचा स्मार्ट फोन विक्रीतील सध्याचा वाटा व्हॉल्यूमवाईज १० टक्केच असला तरी व्हॅल्यूवाईज तो ४० ते ४५ टक्के आहे.त्यामुळे याच बाजारपेठेवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत करणार आहोत. कंपनी सध्या त्यांच्या जपान, चीन आणि मेक्सिको या उत्पादन केंद्रातून स्मार्टफोनचे सुटे भाग आयात करते मात्र इतक्यातच भारतात उत्पादन प्रकल्प उभारला जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कंपनी आणखी तीन नवी स्मार्टफोन मॉडेल्स लवकरच बाजारात आणत आहे.

Leave a Comment