रुपयाचे अवमूल्यन पूर्वनियोजित – देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २४ – सध्या भारतीय रुपयाचे होत असलेले अवमूल्यन पूर्वनियोजित असून देशातील काळा पैसा चलनात आणण्यासाठी केंद्रातील युपीए सरकारने रचलेले हे षडयंत्र आहे, असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केला.

भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर शाखेने गुरूवारी पेट्रोल दरवाढीच्या विरोधात स्थानिक झांशी राणी चौकात जोरदार निदर्शेने केली. यावेळी निदर्शकांना मार्गदर्शन करताना आमदार फडणवीस म्हणाले की, रुपयाचे अवमूल्यन करून डॉलरचे भाव वाढवायचे. वाढीव दरात डॉलर विकत घ्यायचे आणि काळा पैसा चलनात आणायचा हा सरकारचा डाव आहे. यातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा चलनात येईल आणि उद्या या देशात काळा पैसाच नाही असे म्हणण्यास हे सरकार मोकळे राहील. आतापर्यंत या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे लक्ष होते पण आता रिझर्व्ह बँकेलाही दुर्लक्ष करायला सांगण्यात आले आहे, अशी टीका आ. फडणवीस यांनी केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तरीही डॉलर वधारला हे कारण सांगून पेट्रोलची करण्यात आलेली दरवाढ अन्याय्य असल्याचा आरोप करून या दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आ. फडणवीस यांनी यावेळी दिला.

Leave a Comment