मान्सून अंदमानात दाखल

पुणे, दि. २३ – नैॠत्य मौसमी पाऊस अर्थात मान्सून बुधवारी अंदमान निकोबार बेटावर तसेच बंगालच्या उपसागरातील दक्षिणेच्या काही भागात दाखल झाला. नियोजित वेळेच्या तीन दिवस उशिरा पाऊस दाखल झाला असून येत्या दोन ते तीन दिवसात अंदमानसह बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग मान्सून व्यापेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

दरवर्षी साधारणपणे २० मेच्या सुमारास मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल होत असतो. मान्सून दाखल होण्याच्या दृष्टीने अंदामानात पोषक वातावरण असतानाही साधारणपणे तीन दिवस उशिराने दाखल झाला. मान्सून उत्तरेकडेही सरकण्याच्यादृष्टीने अनुकुल स्थिती आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या सूत्रांनी दिली.

सर्वसाधारणपणे एक जूनच्या आसपास केरळात, तर महाराष्ट्रात तळकोकणात ७ जूनला मान्सून सक्रिय होत असतो. असे असले तरी विनाअडथळा प्रवास झाला तर नियोजित वेळेपेक्षाही तो लवकरच दाखल होऊ शकतो. यापूर्वीही मान्सून लवकरच दाखल झाल्याची उदाहरणे आहेत.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय घट झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या आसपास आहे. पुढील ४८ तासात राज्यातील हवामान मुख्यत: कोरडे राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहणार असून मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment