नाराज नेत्यांच्या अनुपस्थितीत भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी आजपासून

मुंबई, दि.२३ – राजस्थानच्या नाराज नेत्या वसुंधरा राजे, पक्षाच्या कार्यपध्दतीवर नाराज असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि कर्नाटकमध्ये पक्षाविरूध्द बंडाचे निशाण फडकावलेले येदीयुरप्पा यांनी बैठकीकडे फिरवलेली पाठ या पार्श्‍वभूमीवर गुरूवारपासून मुंबईत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सुरू होत आहे. या बैठकीनंतर २५ तारखेला परळच्या कामगार मैदानावर होणार्‍या सभेव्दारे भाजपा २०१४ च्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवणार आहे.

या राष्ट्रीय कार्यकारणीत मुख्यत्वे संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार असल्याचे तसेच देशाच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार असल्याचे भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

तसेच, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील दुष्काळी परिस्थितीवर आणि त्यावर नियंत्रण करण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश यावरही चर्चा होईल. याच बैठकित नितीन गडकरी यांच्या गळयात पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ घालताना कराव्या लागणार्‍या पक्षाच्या घटना दुरूस्तीवरही निर्णय घेण्यात येईल.

जरी संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच केंद्र सरकारला आलेल्या अपयशांची यादी मोठी असली आणि केंद्र सरकार अकार्यक्षम असले तरी आपल्याला मध्यवर्ती निवडणुका नकोत, असेही व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

Leave a Comment