जन्नत २

हिंदी चित्रपटसृष्टीत लो बजेटमध्ये उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी भट कॅम्प ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी कुणाल देशमुख या दिग्दर्शकाने इम्रान हाश्मीला घेऊन ‘जन्नत’ हा चित्रपट तयार केला होता. आता कुणाल ‘जन्नत २’ हा चित्रपट घेऊन रसिकांसमोर आला आहे. तसा या चित्रपटाचा मूळ ‘जन्नत’शी काडीचाही संबंध नाही. 

‘जन्नत २’ही कथा आहे सोनू दिल्लीची (इम्रान हाश्मी). जो आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि झटपट पैसे कमवण्यासाठी अवैध हत्यारांची तस्करी करतो. सोनू हत्यार विकण्याचे काम करतो; मात्र हत्यार विकत घेणारा समोरचा व्यक्ती त्याचा उपयोग कशासाठी करतो याच्याशी त्याला काही देणे घेणे नाही. पोलीस रेकॉर्डवर सोनू दिल्लीच्या नावापुढे केकेसी(कुत्ती कमिनी चीज) अशी डिग्री लावण्यात आलेली आहे, यावरून सोनू काय आहे, याचा अंदाज आपल्याला बांधता येईल. एसीपी प्रताप रघुवंशी (रणदीप हुडा) सोनूचा आपल्या कामासाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान जान्हवी तोमर (ईशा गुप्ता) च्या प्रेमात सोनू पडतो आणि  जान्हवीच्या प्रेमासाठी सोनू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचा भूतकाळच त्याचा पाठलाग करतो असे नाही; तर वर्तमानही त्याच्यासाठी तापदायक बनतो. सोनूला बदलायचे आहे, यामुळे तो  एसीपी रघुवंशीला मदत करायचे ठरवतो. सोनूच्या या निर्णयाचा परिणाम काय होतो, यासाठी ‘जन्नत २’ मोठ्या पडद्यावरच बघायला हवा. 

मनुष्य एका विशिष्ट पद्धतीने आपले जीवन जगत असतो. एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागल्यावर तिच्यासारखे आयुष्य जगण्याचा प्रयत्न आपण करतो. आपण जे काही करतो, त्यापेक्षा संपूर्णपणे वेगळे आयुष्य निवडण्याचा प्रयत्न करणे प्रत्येकाला शक्य नसते; कारण आपला भूतकाळ आपल्याशी सदैव जोडला गेलेला असतो. असे काही सांगण्याचा प्रयत्न कुणाल देशमुखने ‘जन्नत २’ मध्ये केला आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा दिल्ली शहरात घडते. दिल्ली शहरसुद्धा यात एक पात्रच आहे. दिल्लीतील दृश्यांबरोबरच दिल्लीतील आजच्या युवकांची बोली आपल्या समोर येते.  चित्रपटातील प्रत्येक दृश्यात शिव्यांचा संबध येतोच. 

संपूर्ण चित्रपट एकट्या इम्रान हाश्मीच्या खांद्यावर ठेवण्यात आला आहे. कथेमध्ये फारसे नावीन्य नसले तरी पटकथेची दमदार मांडणी करण्यात आली आहे. इमन हाश्मी आणि रणदीप हुडा आपल्या भूमिकांची छाप सोडण्यात यशस्वी ठरले आहेत. रणदीप हुडाने साकारलेला सनकी एसीपी  छान रंगलाय. ईशा गुप्ता ठिकठाक आहे. इम्रान हाश्मीला वाव देण्याच्या नादात दिग्दर्शकाने त्यांच्यातील प्रेम कहाणीला दुय्यम स्थान दिले आहे, यामुळे इम्रान-ईशाची ऑनस्क्रीन केमेस्ट्री फारशी प्रभावी झालेली नाही. 

चित्रपटाच्या पटकथेला संवादांची साथ चांगली मिळाली आहे. तरुणाईला पसंत पडतील, असे संवाद यात आहेत. छोट्या-छोट्या वाक्यांमुळे संवाद प्रभावी झाले आहेत. भट्ट कॅम्पचे चित्रपट त्यांच्या संगीतासाठी ओळखले जातात. मागील काही दिवसांत भट कॅम्पचे जे चित्रपट प्रदर्शित झाले, ते  मात्र याला अपवाद ठरले होते. ‘जन्नत २’च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचा यूएसपी संगीत ठरला आहे, यात शंका नाही.  प्रीतमने संगीतबद्ध केलेली `तेरा दिदार हुआ….’, `तू ही मेरा खुदा….’ ही गाणी प्रेक्षकाला कथेशी बांधून ठेवण्यात यशस्वी झाली आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. छायांकनही छान आहे. जीवनाचे विविध रंग उलगडवून दाखवणारा ‘जन्नत २’ एकदा पहायला हरकत नाही. 

Leave a Comment