खाद्यतेल महागणार

मुंबई, दि. २४ – रुपयातील घसरण खाद्य तेलाच्या मुळावर आली असून  देशात खाद्यतेल दर आकाशाला भिडतील असे बाजार तज्ञांचे मत आहे. खाद्यतेलाची मोठी आयात केली जाते. परिणामी रूपयाचे अवमूल्यन खाद्य तेलास धोकादायक ठरत आहे. डॉलरचे मूल्य वधारत असल्यामुळे खाद्यतेलासाठी तेल आयात करणार्‍या कंपन्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. देशात एकूण मागणीच्या जवळपास अर्ध्याहून अधिक खाद्यतेलाची आयात केली जाते. गेल्या वर्षात तेलबियांच्या उत्पादनामध्येही मोठी घट झाली आहे. त्यातच खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढत असल्याने व रूपया कमकुवत होत असल्यामुळे तेलकंपन्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कंपन्यांकडून खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च या तिमाहीत सूर्यफूल, राईचे तेल व शेंगदाणा तेलाच्या किंमती सरासरी २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Leave a Comment