कृष्णा खोर्‍यातील पाणी अडविण्यासाठी नऊ हजार कोटी रूपयांची गरज

पंढरपूर, दि. २३ – कृष्णा खोर्‍यातील ५८५ टी. एम. सी. पाण्यापैकी ५६२ टी. एम. सी. पाणी अडविण्यात आले असून २३ टी. एम. सी. पाणी अडविण्यासाठी नऊ हजार कोटी रूपयांची गरज आहे. हे पाणी अडविल्यास दुष्काळी जिल्ह्याला त्याचा फायदा होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रासाठी कृष्णेचे ५८५ टी. एम. सी. पाणी अडविण्यासाठी भाजपा-शिवसेना युती शासनाने १९९६ साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. या अंतर्गत कर्ज रोखे काढून ७५०० कोटी रूपयांची महत्वाकांक्षी योजना सुरू केली. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले कृष्णेचे ५८५ टी. एम. सी. पाणी पहिल्या टप्प्यात अडविण्यासाठी लवादाप्रमाणे २००० सालापर्यंत मुदत होती. ९६ ते २०११ या काळात ५६२ टी. एम. सी. पाणी अडविण्यात आले असून यावर १७ हजार ९८९ कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. आणखी २३ टी. एम. सी. पाणी अडविणे बाकी आहे. यासाठी नऊ हजार कोटी रूपयांची गरज आहे. यामध्ये म्हैसाळ, ताकारी, टेंभू या योजनेचे काम ७० ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. २०टक्के काम गेल्या १० वर्षांपासून रखडले आहे. योजना पूर्ण न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहचले नाही. योजनेचा खर्च वाढत गेला. कृष्णा खोर्‍यातील ७२ टी. एम. सी. पाणी अतिरिक्त मंजूर झाले आहे. निधी नसल्यामुळे योजना रखडली आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पाणी अडविण्यासाठी कोट्यवधी रूपयांची गरज आहे. महाराष्ट्र , कर्नाटक, तामीळनाडू या राज्यात कृष्णेचे पाणी लवादाप्रमाणे अतिरिक्त मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहंकाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, माळशिरसचा पूर्व भाग, नगर जिल्ह्यातील संगमनेर या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. कृष्णा खोर्‍याचे कामे झाल्यास या तालुक्यांना पाणी मिळणार आहे.

Leave a Comment