रिक्षा चालकांना दोन किलोमीटरसाठी हवे ३४ रुपये भाडे

मुंबई, दि. २३ – मुंबईतील ९८ हजार रिक्षा चालकांना रिक्षा खरेदी, देखभाल दुरुस्ती, स्वत:चा व कुटुबियांचा खर्च लक्षात घेता दरमहा १२ हजार रुपये उत्पन्न मिळाले पाहिजे. त्यासाठी रिक्षा चालकांना १.६ किलोमीटरसाठी २७ रुपये किंवा २ किलोमीटरसाठी ३४ रुपयांचे किमान भाडे द्यावे, अशी मागणी रिक्षा चालक मालक युनियनतर्फे हकीम समितीकडे केली आहे, अशी माहिती रिक्षा चालक – मालक युनियनचे नेते शरद राव यांनी केली.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सरकारने रिक्षा चालकांना केवळ एक रुपये दरवाढ दिली आहे. रिक्षाचे यापूर्वी असलेले ११ रुपये भाडे आता १२ रुपये झाले आहे. मात्र, रिक्षा चालकांना आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने बँकेतून कर्ज काढून व्याज भरुन रिक्षा विकत घ्यावी लागते. रिक्षांची देखभाल, दुरुस्ती कामे, इंधन दरवाढ, कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण, स्वत:चे चहापान, पोलिसांनी काही कारणास्तव पकडले तर द्यावा लागणारा हप्ता आदी गोष्टी पाहता रिक्षा चालकाला वाढत्या महागाईत दरमहा केवळ ३२५० रुपये उत्पन्न मिळते. रिक्षा चालकाला किमान उत्पन्न १२ हजार रुपये मिळायला हवे, असे राव म्हणाले.

Leave a Comment