मोबाईल कंपन्यांत थ्रीजी दरयुद्ध पेटले

मुंबई दि.२३- ट्रायने स्पेक्ट्रूम लिलावाबाबत केलेल्या नव्या नियमावलीसंदर्भात देशातील मोबाईलसेवा क्षेत्रातील कंपन्यांनी युद्धाचा पवित्रा घेतला असतानाच थ्री जी सेवेसाठी आकारण्यात येणार्‍या दरांबाबतही जणू युद्धच सुरू झाल्याचे दिसून येत आहे.भारती एअरटेलने त्यांचे थ्रीजीचे दर नुकतेच कमी केले असताना आता स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांच्यापाठोपाठ आदित्य बिर्ला समुहाच्या आयडिया सेल्युलरनेही मंगळवारीच त्यांचे थ्रीजी सेवेचे दर ७० टक्यांनी कमी केले आहेत. प्रीपेड आणि पोस्टपेडसाठी १० केबी डेटासाठी आता कंपनी तीन पैसे आकारणार आहे. पूर्वी हाच दर १० केबीसाठी १० पैसे होता.

कंपनीच्या म्हणण्यानुसार ग्रामीण भागातील जनतेलाही इंटरनेटचा वापर करता यावा यासाठी हे दर कमी करण्यात आले आहेतच पण त्यामुळे मध्यम शहरातील नागरिकांना घरात इंटरनेटसेवा उपलब्ध करून घेणे आवाक्यात येणार आहे. प्रथमच इंटरनेटचा वापर करणार्‍यांना थ्रीजीचा अनुभव मिळू शकणार आहे. कंपनी सर्व थरांतील नागरिकांसाठीच ही दरकपात करत आहे असेही सांगण्यात आले आहे.

भारती एअरटेलकडूनही सध्या याच दरात थ्रीजी सेवा पुरविली जात आहे तर एअरसेल कंपनीने अनलिमिटेड वापरासाठी प्रतिदिवस आठ रूपये असा दर घोषित केला आहे. ट्रायची करप्रणाली स्वीकारली तर देशाच्या काही सर्कलमध्ये १०० टक्के दरवाढ होईल अशी भीती या कंपन्या व्यक्त करत आहेत तर तज्ञांच्या मते दरकपातीमागे या कंपन्यांची केलेली गुंतवणूक वसुल करण्याचा मानस आहे. थ्रीजी परवान्यासाठी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्जे काढून परवाने घेतले आहेत आणि ही गुंतवणूक मोकळी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आयडियाकडे ११ टेलिकॉम सर्कलचा थ्रीजी परवाना आहे.

Leave a Comment