सोन्याच्या मागणीत २९ टक्के घट

मुंबई, दि. २२ – चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. जानेवारी-मार्च या पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी तब्बल २९ टक्क्यांनी घटली आहे. सोन्याच्या दागिन्यांवरील नवे कर, वाढलेले आयात शुल्क व डॉलरच्या तुलनेत घसरणारा रूपया या घटकांचा परिणाम होऊन सोन्याची २०७.६ टनच मागणी नोंदविल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या अहवालात म्हटले आहे.

रूपयातील अस्थिरतेने देशाच्या अर्थव्यवस्थेस भंडावून सोडले असून, ही अस्थिरता कमी करण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहेत. यामुळे रूपयाच्या तुलनेत बलवान होणार्‍या डॉलरमध्ये पैसा गुंतविण्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत आहे. यापुढे सोन्याची खरेदी फिकी पडू लागल्याने मागणीत झपाटयाने घट होत आहे. जानेवारी-मार्चमध्ये ५६ हजार ६५० कोटी रूपयांचे सोने खरेदी झाले असून, यामध्ये तीन टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच सोन्यामधील गुंतवणूक २७ टक्क्यांनी घटली असून, १५ हजार १७० कोटी रूपयांवर आली आहे.

२०१२ ची सुरूवातच भारतातील सोन्याच्या बाजारासाठी आव्हानात्मक झाली आहे. चलनवाढ, आर्थिक मंदी, वेगाने होणारी सामाजिक उलथापालथ अशा विविध आव्हानांमध्ये सोन्याने आपली चमक कायम राखली आहे. यामुळे मागणीत घट झाली असली तरी येत्या काळात देशांतर्गत सोन्याची मागणी वाढण्याची आशा कायम असल्याचे डब्ल्यूजीसीचे भारत व पश्चिम आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अजय मित्रा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment