रूपयाच्या अवमूल्यनाची आयटी क्षेत्रालाही झळ

मुंबई, दि. २३ – डॉलरच्या तुलनेत रूपयाची होत असलेली दमछाक देशातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची चिंता वाढविणारी ठरत आहे. एकीकडे डॉलर वधारत असल्यामुळे आयटी कंपन्यांना फायदा होईल, असे वरकरणी वाटत असले तरी रूपयाच्या विक्रमी घसरणीची झळ या कंपन्यांनाही बसत आहे. यातील अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कंत्राटाचे पैसे आगऊ घेतले असल्यामुळे वधारलेला डॉलर त्यांच्यासाठी फारसा लाभदायक ठरलेला नाही.

एप्रिलपासून डॉलरच्या तुलनेत रूपयाचे सात टक्के अवमूल्यन झाले. गेल्या आठवडयाभरच्या कालावधीमध्ये रूपयाचे झालेले १० टक्के अवमूल्यन चिंता वाढविणारे आहे. देशातील आयटी क्षेत्राची उलाढाल १०० अब्ज डॉलरच्या आसपास आहे. यामध्ये अनेक कंपन्यांकडून सॉफ्टवेअरची निर्यात केली जाते. अमेरिका व युरोपमध्ये या कंपन्यांचा मोठा व्यवसाय असून, त्यांचे आर्थिक व्यवहार डॉलरमध्ये केले जातात. डॉलर वधारत असल्यामुळे या कंपन्यांना मोठा फायदा होईल, अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र यातील बहुतेक कंपन्यांनी आपली देणी आगाऊ स्वरूपात वसूल केली असल्याने डॉलर वधारल्याचा फारसा फायदा त्यांना होणार नाही, असे आयटी कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या ’नॅसकॉम’ने म्हटले आहे. गेल्या तीन सत्रांमध्ये चलन बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. डॉलर व रूपयांच्या व्यवहारातील चढ-उतार आयटी बरोबरच कोर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांसाठी ही मारक आहेत.

Leave a Comment