रीबॉक इंडिया कंपनीत प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा

नवी दिल्ली दि.२३- क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची निर्मिती करणार्‍या जगप्रसिद्ध रीबॉक कंपनीच्या रीबॉक इंडिया शाखेत तब्बल ८७०० कोटी रूपयांचा घोटाळा करण्यात आल्याचे समजते. राजू रामलिंग यांच्या सत्यम घोटाळा प्रकरणानंतर कार्पोरेट क्षेत्रातील हा दुसरा मोठा घोटाळा ठरण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुभिन्दरसिंग प्रेम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णू भगत यांच्यावर हा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यासंबंधीची तक्रार गुरगांव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. कंपनीच्या अर्थविभाग प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील दोघांनी कंपनीच्या ब्रँडेड वस्तू दुसर्‍या कंपनीला कमी किमतीत विकल्या आहेत तसेच कंपनीची उत्पादने स्वतंत्र गोदामात लपवून त्यांचीही विक्री केली आहे असा आरोप करण्यात आला आहे. या मुळे कंपनीला ८७०० कोटी रूपयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागले असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वास्तविक हा घोटाळा मार्चमध्येच लक्षात आल्याबरोबर सिंग यांची हकालपट्टी करण्यात आली होती. सिंग रीबॉक आणि आदिदासची उत्पादने परस्पर विकत असल्याचे त्यावेळी उघड झाले होते. तसेच कंपनीला विश्वासात न घेता अनेक सौदे सिंग व भगत यांनी केले होते असेही दिसून आले होते. सत्यम प्रकरणात १४ हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला होता व त्यासंदर्भात कंपनीचे मालक राजू रामलिंग यांना तुरूंगातही जावे लागले होते. नुकतीच त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

Leave a Comment