पुण्यातील पुणे वॉरिअर्सच्या कार्यालयात आयकर विभागाकडून चौकशी

पुणे दि.२३- आयपीएल सामन्यात खेळलेल्या पुणे वॉरिअर्स संघाच्या पुण्यातील कार्यालयात आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेतील काळा पैसा आणि मॅचफिक्सिंग प्रकरणात करण्यात आलेल्या स्टींग ऑपरेशनचा आधार घेऊन ही चौकशी करण्यात येत असून पुणे वॉरिअर्सच्या खेळांडूंचीही चौकशी केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

इंडिया टिव्हीने या संदर्भात राबविलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये स्पॉट फिक्सिंगसाठी खेळाडू रोख पैसे घेताना दिसले होते तसेच यात काळ्या पैशांचाही व्यवहार झाला असल्याचे उघड झाले होते. बीसीसीआयने स्टींग ऑपरेशनची चित्रफित पाहून निर्णय घेणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे तसेच कोणताही भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिललाही टेलिकॉन्फरन्सिंग करण्याची सूचना देण्यात आली आहे.

स्टींग ऑपरेशनमध्ये भारतीय क्रिकेट स्टारसोबत तसेच आंतराराष्ट्रीय खेळाडू व टीममालकांचाही समावेश असल्याचे दिसून आले आहे. कांही खेळाडूंनी याबाबतची कबुलीही दिली आहे. त्यानुसार बॉलरला एक नोबॉल टाकण्यासाठी १० लाख दिले गेले आहेत तर साठ लाख रूपये दिल्यास टीमबदल करण्याची तयारीही कप्तानांनी दाखविली असल्याचे स्पष्ट दिसले आहे.

Leave a Comment