टोकिओ, दि. २२ – टोकिओमध्ये जगातील सर्वात उंच म्हणजे ६३४ मीटर उंची असलेला टॉवर बांधून पूर्ण झाला असून हा टॉवर जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. या टॉवरचे नाव ’टोकिओ स्कायट्री’ असे असून त्यांची उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या जवळजवळ दुप्पट आहे. हा टॉवर उभारण्यासाठी ६५ अब्ज येन (८०६ दशलक्ष डॉलर) इतका खर्च आला आहे.
’टोकिओ स्कायट्री’ हा टॉवर खरे म्हणजे २९ फेब्रुवारी २०१२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होता. पण मार्च २०११ मध्ये झालेल्या भयानक भूकंपानंतर या टॉवरचे बांधकाम लांबणीवर पडले होते. या टॉवरच्या बांधकामास २००८ मध्ये सुरूवात झाली होती. चीनमधील कॅन्टन टॉवरपेक्षा हा टॉवर उंच आहे. कॅन्टन टॉवरची उंची ६०० मीटर आहे. जगातील विविध टॉवरच्या तुलनेत या टॉवरची उंची जगात सर्वात जास्त असली तरी दुबईमध्ये ’बूर्ज खलिफा’ या नावाची जी ८३० मीटर उंचीची गगनचुंबी इमारत उभारण्यात आली आहे, त्यापेक्षा या टॉवरची उंची २०० मीटरने कमी आहे.
टोकिओमध्ये उभारण्यात आलेल्या या टॉवरचा वापर रेडिओ आणि टीव्हीवरील कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी करण्यात येणार आहे. तसेच या टॉवरमध्ये एक मत्स्यालय, थिएटर, काही शैक्षणिक संस्था यांची कार्यालये असणार आहेत. हा टॉवर पाहण्यासाठीची तिकिटे लगेचच संपली असून ज्यांना हा टॉवर पाहायचा आहे, त्यांना आता जुलैच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.