२५ मे रोजी प्रकाशित होणार `जय जय महाराष्ट्र माझा’

आपण ज्या शहरात किंवा राज्यात जन्मतो त्या भूमीबद्दल प्रेम, अत्मियता आपण कायम जपत असतो. ही भूमी सोडून कुठेही गेलो तरी तिच्याबद्दल ओढ मात्र कायम असते. ह्या मातीची ओढ असणा-या एका मुलीची आणि भावनिक नात्यांची अशीच कथा बघायला मिळणार आहे `जय जय महाराष्ट्र माझा’ या आगामी मराठी चित्रपटात. गौतम अरूण जोगळेकर यांच्या जी.जे. क्रिएशन्स या बॅनरखाली बनलेला आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या  २५ मे ला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची कथा आहे अश्‍विनी स्टिव्हनसन्स(अनूषा दांडेकर) या अमेरिकेतील वाढलेल्या मुलीची. वयाच्या चौथ्या वर्षी पुण्यातील एका अनाथाश्रमातून दत्तक जाऊन अश्‍विनी अमेरिकेत वसली. हुशार, मनमिळावू आणि मेहनती अश्‍विनी, आज जगातील अव्वल टेनिसपटू बनली आहे. लहानपणी आपला सांभाळ केलेल्या आश्रमाला भेट द्यायच्या हेतूने, ती दहा दिवसांच्या दौ-यावर येते. अश्‍विनीच्या महाराष्ट्र भेटीची जवाबदारी स्वीकारलीये कोल्हापूरच्या मान्यवर मोहिते खानदानानं.. आणि या खानदानाचे सुपुत्र…श्रीमंत विशालसिंह मोहिते (हेमंत ढोमे) या मोहिमेवर नेमले गेलेत. विशाल बरोबरचा हा मुंबई-पुणे-कोल्हापूर-पुणे-मुंबई प्रवास आणि या दौ-यात तिचं मराठी मातीशी, मराठी पाहुणचाराशी आणि मराठी संस्कृतीशी जुळलेलं नातं..हेच या कथानकाचं प्रमुख सूत्र!

या चित्रपटाच्या कथेबरोबरच याची जमेची बाजू आहे याचं कास्टींग. महेश मांजरेकर आणि मृणाल कुलकर्णी या सिनेमाद्वारे प्रथमच एकत्र रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत… आणि दोघेही त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळ्या भूमिकांत दिसणार आहेत. सिद्धार्थ चांदेकरही एक मध्यवर्ती पात्र वठवतोय. याशिवाय आदिती गोवित्रीकर, यतीन कार्येकर, माधव अभ्यंकर, स्वाती चिटणीस, विजय केंकरे, मंगल केंकरे यांच्याही भूमिका आहेत.

आणखी एक भक्कम अंग म्हणजे याचं संगीत. या एका चित्रपटात चार वेगळ्या संगीतकारांनी गाणी दिलीत. `हसत राहू या या’ अवखळ गाण्याला अजित-समीर यांनी, `का हो दाजिबा’ ही लावणी संगीतबद्द केली. के. सी.लॉय यांनी. पुण्याचं गौरवगीत धन्यही पुण्यनगरी बांधलं.  ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी तर चित्रपटातील दोन गाण्यांचं संगीत बैलगाडी रॉक आणि मायमातीचा गंध स्वत: गौतमचंच आहे.