संपूर्ण विदर्भ जळतोय दुष्काळाच्या खाईत

मुंबई दि.२२ – महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी दुष्काळाने आपले पाय पुन्हा पसरलेले दिसत असतानाच गेल्या कांही दिवसांत सातत्याने वाढत चाललेल्या तापमानाचा विदर्भावर फारच विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या उन्हामुळे विदर्भातील सुमारे ४३०० खेडी अक्षरशः कोरडी पडली असून या भागातील तळी, सरोवरे,विहीरी आणि पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत. बहुतेक भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी कित्येक ठिकाणी टँकरनेही केवळ पिण्यापुरते आणि जनावरे जगविण्यापुरतेच पाणी मिळू शकते आहे. अन्य बाबींसाठी पाण्याचा वापर करता येणे अशक्यच बनले आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील ३३१ खेडी, यवतमाळ जिल्ह्यातील ८००, गडचिरोली जिल्ह्यातील ३०० तर वर्धा जिल्ह्यातील १२० खेडी भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांकडे याबाबत माहिती दिली असून केंद्राकडून ७०० कोटी रूपयांची मदत मिळविली आहे. या मदतीतून नागपूर जिल्ह्यासाठी १३.९९ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. ही योजना ३५४ खेड्यांसाठी आहे. नरसाळ, हुडकेश्वर, बेसा अशा अनेक भावांतून विहिरी पूर्ण कोरड्या पडल्या आहेत.
 
स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागाला दुष्काळ नवीन नाही. दरवर्षाआड येथे दुष्काळ पडतोच. त्यामुळे कायमस्वरूपी योजना राबविणे गरजेचे आहे. त्यात जलसंधारणासारखी कामे हाती घेण्याबरोबरच सम्रुद्राचे पाणी प्रोसेस करून किमान अन्य वापर व शेतीसाठी वापरता येणे शक्य आहे.

Leave a Comment