पुण्यातील आजच्या सामन्याला शाहरूख येणार

पुणे दि.१९ – वानखेडे स्टेडियमवर दोन दिवसांपूर्वीच झालेल्या शाहरूख धिंगाणा प्रकरणात शाहरूख खानवर पाच वर्षांसाठी वानखेडे प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली असली तरी आज पुण्याच्या गहुंजे येथे होत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स व पुणे वॉरिअर्समधील अटीतटीची झुंज पाहण्यास शाहरूख उपस्थित राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
   गहुंजे येथील सहारा स्टेडियमपर्यंत पोहोचणे शाहरूखसाठी कदाचित थोडे अडचणीचे होणार आहे कारण मावळ तालुक्यात हे स्टेडियम आहे आणि मावळ तालुक्यावर प्रभाव आहे तो शिवसेनेचा. गहुंजे येथे शाहरूख आला तर त्याच्याविरोधात निदर्शने करण्याचा स्थानिक शिवसेना नेत्यांचा प्लॅन असल्याचेही समजले आहे.
  शाहरूखच्या जवळच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या टीमची एकही मॅच शाहरूख कधीच चुकवत नाही. त्यामुळे तो या मॅचला कदाचित थोडा उशीरा येईल पण येणार हे नक्की. या सीझनमधील एकही मॅच त्याने चुकविलेली नाही. त्यातच यंदा त्याच्या टीमचा म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचा परफॉर्मन्सही उत्तम होतो आहे. मग मॅचमधील दोन बॉल पडण्याच्या दरम्यान दूरदर्शनवर झळकण्याची संधी तो काय म्हणून सोडेल असा सवालही केला जात आहे.
या मॅचला जाणार्‍या पुणेकरांनाही शाहरूखचा दर्शनाची आस अधिक आहे. शाहरूखचे कांहीच चुकलेले नाही असे सांगणारे जसे अनेक भेटले तसे शाहरूख नट आहे तसाच माणूसही आहे. त्यालाही राग येऊ शकतो अशी त्याची बाजू घेणारेही भेटले.
शिवसेनेच्या प्रवक्त्त्या निलम गोर्‍हे यांनी मात्र पक्षाने वानखेडे स्टेडियमवर घडलेल्या नाट्याबाबत अजून कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही असे सांगतानाच परवाची घटना एमसीए आणि शाहरूख यांच्यातील आहे. शिवसेनेचा त्याच्याशी संबंध नाही असेही स्पष्ट केले आहे.

Leave a Comment