२९ कोटीच्या घोटाळ्यात देवकर यांना जामीन मंजूर

जळगाव दि. २१ मे – सुमारे २९ कोटी रूपयांच्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सोमवारी अखेर राज्याचे परिवहन, कृषी आणि दुग्धविकास राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक करण्यात आली. देवकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केली. दरम्यान, घरकुल योजनेला जेंव्हा मंजुरी मिळाली तेंव्हा देवकर हे जळगावचे नगराध्यक्ष असल्याने त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे सांगण्यात येते. या घरकुल योजनेसाठी १९९७ मध्ये ११ हजार घरांसाठी सुमारे ८० कोटीं रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या.

देवकर यांनी या आधी वेळोवेळी स्पष्ट केले आहे की त्यांनी फक्त ठरावांवर सह्या केल्या असून खरे सूत्रधार श्री सुरेश दादा जैन हे आहेत.’आम्ही तर सह्याजीराव’ या देवकारांच्या बेजवाबदार विधानावर जळगावातील  जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.

दरम्यान, देवकर यांनी आपल्याकडे आधीच राजीनामा सोपविल्याचे राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी सांगितले असून न्यायालयीन कारवाईनंतर पक्ष यावर निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले.आता राष्ट्रवादी काय  निर्णय घेते या कडे संपूर्ण  जळगाव शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment