सिध्दीकीच्या गोपनीय माहितीचा उलगडा करण्यासाठी एटीएसचे पथक बिहारला जाणार

पुणे, दि. २१ – इंडियन मुजाहिद्दिनचा सदस्य मोमीद सिध्दिकी याने मुंबई दहशतवाद विरोधी पथकासह (एटीएस) दिलेल्या गोपनीय माहितीची खातरजमा करण्यासाठी एटीएस पथक बिहारला रवाना होणार आहे. एटीएसने सिध्दिकीला सोमवारी न्यायमूर्ती स्वरूप बोस यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटा दिवशी पुण्यातील दगडूशेठ मंदिर परिसरात सिध्दिकी याने बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी वकील ए. व्ही. औसेकर यांनी एटीएसच्यावतीने न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, सिध्दिकीच्या पुणे व मुंबईतील वास्तव्याचा तपास करण्यात आला असून, त्याने तपासात गोपनीय माहिती दिली आहे. तसेच गुन्ह्याच्या पुराव्याच्यादृष्टीने काही माल जप्त करण्यात आला आहे. त्याचे मोबाईल फोनचे रेकॉर्ड तपास करणे, पुणे-मुंबई प्रवासातील स्कॉर्पिओ जीपचा शोध घेणे, बॉम्ब तयार करण्यासाठी त्याने साहित्य कोणाकडून आणलेत त्यास आर्थिक मदत कोणी केली याचा तपास करणे बाकी आहे.

गुन्हे केल्यानंतर तो विविध राज्यात फिरला असल्याने त्यादृष्टीने तपास करण्यासाठी एटीएसचे पथक बंगलोर व दिल्ली येथे रवाना झाली आहेत. बिहार राज्याजील दरभंगा व समस्तीपूर या ठिकाणच्या काही गोपनीय माहितीचा त्याने उलगडा केला असून, त्यासाठी त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबई एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त समद शेख यांनी सांगितले की, पहाडगंज येथे झालेल्या गोळीबारात सिध्दिकीचा हात असून मिसफायरमध्ये त्याच्यावरच गोळीबार झालेला आहे. दिल्ली पोलिसांच्या अटकेत असलेला त्याचा साथीदार अजमल याच्याकडेही एटीएस तपास करीत आहेत. बचाव पक्षाच्यावतीने ऍड. कायनाथ शेख यांनी बाजू मांडली.

Leave a Comment