भीषण बॉम्बस्फोटात १०० ठार

साना, दि. २२ – येमेनची राजधानी सानामध्ये लष्करी वेशातील एका आत्मघातकी बॉम्बरने घडवून आणलेल्या भीषण स्फोटात १०० हून अधिक सैनिक ठार झाले असून या स्फोटामध्ये २२० लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. बॉम्बस्फोटाची ही घटना सोमवारी घडली असून येमेनच्या सैनिकांवर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे. येमेनमधील अल काईदाच्या सदस्यांनी हा स्फोट घडविल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या हल्ल्याचा निषेध करून येमेनमधील सर्वांनी हिंसाचाराचा त्याग करावा, असे आवाहन केले आहे.

लष्करी संचलनाची रंगीत तालीम चालू असताना सबीन चौकात हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. राष्ट्राध्यक्षांच्या महालापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर ही घटना घडली. हा स्फोट झाला, तेव्हा संरक्षणमंत्री मुहमद नासेर अहमद आणि लष्करप्रमुख अहमद अल-अशवाल हे दोघे त्या परिसरातच होते. सुदैवाने ते दोघे या हल्ल्यातून बचावले. या घटनेनंतर बोलताना राष्ट्राध्यक्ष अब्द्राबुह मन्सूर हादी म्हणाले की, अशा घटना घडल्या तरी दहशतवादाविरूद्धची आमची लढाई चालूच राहिल. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांनी सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍यांची हकालपट्टी केली असून त्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्षांच्या पुतण्याचाही समावेश आहे.

Leave a Comment