केंद्रातले सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल- भाजप

नवी दिल्ली दि.२२ -युपीए सरकार आपल्या कारकिर्दीची तीन वर्षे पूर्ण करून त्याचा आनंद साजरा करत असतानाच भाजपाने कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल असे भाकित वर्तविले आहे. त्यामागचे कारण देताना भाजप प्रवक्ते शाहनवाझ हुसेन म्हणाले की या सरकारमधील सहकारी पक्ष नाराज आहेत. पंतप्रधानांनी या समारंभानिमित्त योजलेल्या भोजन समारंभात त्यांच्यासोबर जेवण्यासही त्यांची तयारी नाही. ममता बॅनर्जी, जयललिता यांनी या समारंभात न जाण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. जेवण जाऊदे साधे उपहाराचे पदार्थही त्यांच्याबरोबर खाण्यास त्या तयार नाहीत. या सरकारचा तीन वर्षांचा हा कार्यकाल काळ्या अक्षरांतच नोंदविला गेला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

सरकार त्यांच्याकडे बहुमताचा २७२चा आकडा असल्याचा दावा करत आहे पण सहकारी पक्षांची नाराजी पाहता ही संख्या २२७ तरी भरेल की नाही याची शंकाच आहे असेही हुसेन म्हणाले. सध्याच्या अधिवेशनात या सरकारला अनेकवेळा अनेक विधानांवर माघार घ्यावी लागली आहे आणि आम्ही खंबीर विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी केली आहे असे सांगून हुसेन म्हणाले की सध्याची परिस्थिती पाहता हे सरकार कधींही कोसळेल अशीच परिस्थिती आहे असेही ते म्हणाले.