आंध्रप्रदेशात रेल्वे अपघात, २४ ठार ४० जखमी

हैदराबाद, दि. २२ मे, – आंध्र प्रदेशातील पेनुकोंडा रेल्वे स्थानकात बंगळुरूकडे निघालेली हंपी एक्स्प्रेस आणि मालगाडी यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात २४ ठार आणि अन्य ४० जण जखमी झाले आहेत. पेनुकोंडा स्थानकात पहाटे सव्वातीनच्या दरम्यान हा अपघात झाला. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीवर हुबळीहून बंगळुरूकडे निघालेली हंपी एक्स्प्रेस धडकल्याने ही दुर्घटना घडली. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यात येत असले तरी हंपी एक्स्प्रेसच्या चालकाने सिग्नल तोडून गाडी पुढे नेल्याने ही दुर्घटना झाली असावी, असे रेल्वेच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

हंपी एक्स्प्रेस मालगाडीवर धडकल्याने या गाडीचे दोन डबे रूळावरून घसरले आणि त्या डब्यांनी पेट घेतला. मात्र ही आग लगेचच आटोक्यात आणण्यात आली. पण डब्यांना लागलेल्या आगीमुळे मदतकार्य त्वरेने करण्यात अडथळे येत होते. हंपी एक्स्प्रेसने मालगाडीस धडक दिल्याने हंपी एक्स्प्रेसचे इंजिन; तसेच पहिल्या तीन डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त कळताच जखमींना मदत करण्यासाठी; तसेच अडकून पडलेल्या प्रवाशांना नेण्यासाठी एक विशेष गाडी बंगळुरूहून पेनुकोंडाकडे पाठविण्यात आली. तसेच वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. या अपघातात मरण पावलेल्यांच्या नातलगांना प्रत्येकी एक लाख रूपये; तर जखमी झालेल्यांना २५ हजार रूपये देण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी, अपघातग्रस्तांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश राज्य सरकारच्या यंत्रणांना दिले आहेत.

 

रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांना अपघाताचे वृत्त कळताच ते घटनास्थळी रवाना झाले असून या अपघाताच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. या अपघातामुळे आंध्र प्रदेशातून बंगळुरूकडे जाणार्‍या गाड्या विलंबाने धावत आहेत

Leave a Comment