अभिनव कला महाविद्यालय बंद होणार ?

भारतीय कला प्रसारणी सभा संस्थेच्या दोन गटातील वाद न्यायप्रविष्ठ असताना या संस्थेचे अभिनव कला महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून २०१५ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून शासनाने या प्रकरणात प्राथमिकतेने लक्ष घालावे. तसेच महाविद्यालयाच्या कारभारासाठी प्रशासक नेमावा, अशी मागणी सोमवारी या महाविद्यालयाच्या आजी, माजी विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय बंद करण्यात येणार असल्याचे पत्र देण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी आजी, माजी विद्यार्थी आणि भारतीय विद्यार्थी सेना यांच्या सहकार्यांने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकमताने ही मागणी करण्यात आली. या बैठकीस जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर थोपटे आणि रावसाहेव गुरव, माजी राज्य कला संचालक मधुकर नांगरे, भारतीय विद्यार्थी सेनेच्या शहर संघटक मनिषा धारणे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

कला क्षेत्रात अभिनव कला महाविद्यालयाचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. कलाकारांसाठी हे एक पवित्र स्थान आहे. मात्र, १७ मे रोजी येथील विद्यार्थ्यांना हे महाविद्यालय २०१५ पर्यंत बंद करण्यात येत असल्याचे पत्र मिळाले. महाविद्यालयाला ९० टक्के अनुदान शासनाकडून मिळत असतानादेखील १० टक्के अर्थसहाय्य उभारता येणे अशक्य असल्याचे पत्रात म्हटले आहे. यामध्ये विनाअनुदानीत जागांच्या बदल्यात मिळणार्‍या ३० ते ३५ लाखांच्या वार्षिक उत्पन्नांचा उल्लेख का करण्यात आलेला नाही?  तसेच महाविद्यालयाची पाषाण येथील इमारत मोडकळीस आली असल्याने हे महाविद्यालय बंद करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र शिक्षण विभागाला पाठवण्यात आले आहे.

वास्तविक, महाविद्यालयाच्या भारतीय कला प्रसारणी सभा संस्थेच्या कार्यकारणीवरून दोन गटात वाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सध्याचे विद्यमान सचिव बाबा पाठक यांच्याकडे मागील वर्षीपासून काही काळासाठी महाविद्यालयाचा कारभार सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, त्यांना महाविद्यालय बंद करण्याचा अधिकार कोणी दिला? याबाबत कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे का?  या महाविद्यालातून महाराष्ट्र आणि देशातील अनेक भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. हे महाविद्यालय बंद झाल्यास त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? असे प्रश्‍न या बैठकीत उपस्थित करण्यात आले.

या प्रकरणात शासनाने स्वत:हून लक्ष घालावे आणि महाविद्यालयाचा कारभार सांभाळण्यासाठी प्रशासक नेमावा, अशी एकमताने मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन आजी, माजी विद्यार्थी आणि पालकांच्या स्वाक्षर्‍यांसह शिक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?
राज्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्टनंतर कला शिक्षणासाठी अभिनव महाविद्यालयाचे नाव घेतले जाते. येथे राज्यासह देशातील अनेक भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सरकारी कोट्यातून येथे अनुसुचीत जाती जमातीतील विद्यार्थ्यांना तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हे महाविद्यालय बंद झाले तर या विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? संस्थेच्या वादात विनाकारण विद्यार्थ्यांसह कर्मचारी आणि पालक भरडले जात आहेत.

माजी विद्यार्थी म्हणतात, आम्ही महाविद्यालय चालवू
सध्याच्या कार्यकारिणीला निधी अभावी हे महाविद्यालय चालवणे कठीण जात असल्यास तुम्ही पदभार सोडा. आम्ही कलासक्त माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा कारभार चालवू, अशी भूमिकाही या बैठकीत सामुहिकरित्या पुढे आली. तसेच ज्यांना कलेचा गंधही नाही, अशा लोकांच्या हातात महाविद्यालय असेल तर त्यांना या महाविद्यालयाचे महत्त्व कळणारच नाही, अशी तीव्र प्रतिक्रियाही यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

त्रिसदस्यीय चौकशी समितीचे आदेश
या प्रकरणी भारतीय विद्यार्थी सेनेच्यावतीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागील आठवड्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. यावर टोपे यांनी अभिनव महाविद्यालयप्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये महाराष्ट्र राज्य कला संचालक जी. बी. धानोरकर, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्चे एक पदाधिकारी आणि कला क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती आदी तीन लोकांचा समावेश असेल. अहवाल तयार करून ही समिती शासनाकडे पाठवणार आहे.