फेसबूक संस्थापक मार्क झुकेरबर्ग विवाहबद्ध

न्यूयॉर्क – “फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचा अब्जाधीशी संस्थापक मार्क झुकेरबर्ग याचे फेसबुक प्रोफाइल स्टेटस आता अपडेट झाले आहे. रिलेशनशिप स्टेटसमध्ये तो आता मॅरिड झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये काल झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात झुकेरबर्ग मैत्रीण प्रिसिला चॅनशी विवाहबद्ध झाला.

फेसबुकच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे अमेरिकेतील अब्जाधीशच्या पंक्तीत बसलेल्या झुकेरबर्गला “मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखले जात होते. दोन दिवसांपूर्वीच फेसबुकचा आयपीओ बाजारात आल्यामुळे झुकेरबर्ग कमालीचा उत्साही होता. त्यातच त्याने विवाहाची अपेक्षित; पण गोड बातमी दिल्याने फेसबुकवरील त्याच्या प्रोफाइलवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. विवाहानंतर त्याने पत्नी प्रिसिलासोबतचे काही फोटो प्रोफाइलवर अपलोड केले. त्याला अवघ्या काही मिनिटांत तब्बल सहा लाख लोकांनी “लाईक’ केले. दिवसभर या “लाईक्‍स’मध्ये भर पडतच होती.

झुकेरबर्ग आणि प्रिसिला यांची गेल्या ९ वर्षांपासूनची मैत्री आहे. प्रिसिलाने वैद्यकीय क्षेत्रातील नुकतीच पदवी घेतली आहे. विवाह सोहळ्याला निवडक पाहुणेच उपस्थित होते. त्यांना विवाहाची काहीच कल्पना नव्हती. त्यांना प्रिसिला पदवीधर झाल्याची पार्टी असल्याचे सांगण्यात आले होते. विवाहाच्या घोषणेने वधू-वराने सगळ्यांनाच चकित केले.

Leave a Comment